अनधिकृत मालिका : आॅस्ट्रेलिया अ ची भारतावर ३ गडी राखून मात
By Admin | Published: September 11, 2016 08:30 PM2016-09-11T20:30:29+5:302016-09-11T20:31:05+5:30
सलामीवीर कॅमरून बेनक्रॉफ्टच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलिया अ संघाने आज काही प्रतिकूल परिस्थितीतून गेल्यानंतरही पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघावर ३ गडी राखून मात
ऑनलाइन लोकमत
ब्रिस्बेन : सलामीवीर कॅमरून बेनक्रॉफ्टच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलिया अ संघाने आज काही प्रतिकूल परिस्थितीतून गेल्यानंतरही पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघावर ३ गडी राखून मात करीत दोन सामन्यांच्या मालिकेत १-0 अशी आघाडी घेतली आहे.
आॅस्ट्रेलिया संघाने १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या व अखेरच्या दिवशी आज ४ बाद ५९ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी नियमित अंतराने विकेटस् गमावल्या; परंतु बेनक्रॉफ्टने अखेरपर्यंत किल्ला लढवला. त्याने १५१ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ५८ धावा केल्या. त्यात ६ चौकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलिया अ संघाने ७ बाद १६१ धावा करीत विजय मिळवला.
गुलाबी चेंडूने खेळवल्या गेलेल्या या कमी धावसंख्येच्या सामन्यात भारत अ संघाने पहिल्या डावात २३0 धावा करीत आॅस्ट्रेलियाला २२८ धावांत गुंडाळले होते. तथापि, भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त १५६ धावाच करू शकला होता. मैदान ओलसर असल्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ तीन तास उशिरा सुरू झाला. आॅस्ट्रेलिया अ संघाला विजयासाठी १00 धावांची गरज होती आणि त्यांचे ४ फलंदाज बाकी होते. त्यांनी ३५.३ षटकांत उर्वरित धावा करीत विजय नोंदवला.
बेनक्रॉफ्टला बीयू वेबस्टर (३0) याने चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ५७ धावांची भागीदारी केली. वरुण अॅरोनने वेबस्टरला पायचीत करीत ही भागीदारी भंग केली. त्यानंतर सॅम व्हाईटमन (१४) आणि चॅड सेयर्स (१५) यांच्या उपयुक्त खेळीने आॅस्ट्रेलिया विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचू शकला. भारताकडून शार्दूल ठाकूरने ४२ धावांत ३ व अॅरोनने ५२ धावांत २ गडी बाद केले. हार्दिक पांड्या आणि आॅफस्पिनर जयंत यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसरी अनधिकृत कसोटी १५ सप्टेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवली जाईल.
संक्षिप्त धावफलक
भारत अ पहिला डाव : २३0 आणि दुसरा डाव १५६.
आॅस्ट्रेलिया अ : पहिला डाव २२८ व दुसरा डाव ७ बाद १६१.