...तोपर्यंत राष्ट्रीय स्पर्धा खेळणार नाही
By admin | Published: July 10, 2015 01:57 AM2015-07-10T01:57:46+5:302015-07-10T01:57:46+5:30
पुरुषांसारखी समान बक्षीस रक्कम महिलांना मिळेपर्यंत आपण राष्ट्रीय स्क्वॅश चॅम्पियनशिप खेळणार नसल्याची घोषणा भारताची अव्वल मानांकित स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लिकल हिने केली आहे.
नवी दिल्ली : पुरुषांसारखी समान बक्षीस रक्कम महिलांना मिळेपर्यंत आपण राष्ट्रीय स्क्वॅश चॅम्पियनशिप खेळणार नसल्याची घोषणा भारताची अव्वल मानांकित स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लिकल हिने केली आहे.
केरळची ही खेळाडू प्रथमच आपल्या राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यास उत्सुक होती; पण या स्पर्धेतील विजेत्या पुरुष खेळाडूंसाठी महिलांच्या तुलनेत बक्षिसाची रक्कम अधिक असल्याने सलग चौथ्या वर्षी स्पर्धेतून माघार घेण्याचा दीपिकाने निर्णय घेतला. २३ वर्षांची दीपिका २०११मध्ये अखेरची राष्ट्रीय स्पर्धा खेळली, त्या वेळी ती चॅम्पियन बनली होती.
जागतिक क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान पटकविणारी एकमेव भारतीय दीपिका आपला मुद्दा पटवून सांगताना म्हणाली, ‘‘आम्ही समान बक्षीस रकमेचे हक्कदार आहोत. याच मुद्द्यांवर मी गेल्या तीन सत्रांत राष्ट्रीय स्पर्धेकडे पाठ फिरविली. पीएसए व्यावसायिक सर्किटमध्ये दोन्ही गटांत समान बक्षीस रक्कम दिली जाते.’’
जागतिक क्रमवारीत दीपिका सध्या १८व्या स्थानावर आहे. ती म्हणते, ‘‘महिला आणि पुरुष खेळाडूंमध्ये पुरस्कार देताना भेदभाव का केला जातो, हे समजण्यापलीकडचे आहे. मी केरळमध्ये खेळण्यास इच्छुक होते; पण याच कारणामुळे मी खेळू शकणार नाही, याचे शल्य आहे.’’ केरळ स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव अनिश मॅथ्यू म्हणाले, ‘‘स्पर्धेत एकूण ६.७ लाख रुपयांचे पुरस्कार दिले जातील. दोन्ही गटांतील विजेत्याना किती रक्कम दिली जाईल, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.’’ (वृत्तसंस्था)