Neeraj Chauhan: भारताला मिळाला अजून एक 'नीरज'; रस्त्यावर भाजी विकणारा तरुण करणार भारताचे प्रतिनिधित्व
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 04:00 PM2022-03-29T16:00:59+5:302022-03-29T16:02:13+5:30
Asian Games Neeraj Chauhan: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील युवा तिरंदाज नीरज चौहान आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे.
लखनौ: गेल्यावर्षी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण कामगिरी केली होती. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी सुपर्णपदक जिंकले. त्यानंतर आता अजून एक नीरज भारताचे नाव उंचावण्यासाठी तयार आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील युवा तिरंदाज नीरज चौहान(Neeraj Chauhan) आशियाई क्रीडा स्पर्धेत (2022 Asian Games) भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. आशियाई स्पर्धेसोबतच नीरजची तिरंदाजी विश्वचषक आणि जागतिक खेळांमध्येही निवड झाली आहे.
गरिबीवर केली मात...
दोन वर्षांत कोरोना काळात अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली. अनेकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु यावर मात करुन उत्तर प्रदेशच्या नीरज चौहानने आपले कुटुंब तर साभाळलेच, सोबत आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरुच ठेवली. हरियाणाच्या सोनीपत येथे 24 ते 30 मार्च दरम्यान सुरू असलेल्या तिरंदाजीच्या चाचणीत नीरज पात्र ठरला आहे. चाचण्यांमध्ये दुसरे स्थान पटकावून नीरजने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
A year after getting financial help from the Sports Ministry, UP Archer Neeraj Chauhan makes it to India’s Asian Games team
— PIB In Meghalaya (@PIBShillong) March 28, 2022
Details: https://t.co/dEV2luCst1@IndiaSports@PIB_India@MIB_Indiapic.twitter.com/RVd2Vu4mTC
कोरोना काळात रस्त्यावर भाजी विकली
नीरज चौहानचे वडील अक्षयलाल हे मेरठमधील कैलाश प्रकाश स्टेडियममध्ये स्वयंपाकी म्हणून काम आहेत. याच स्टेडियममध्ये नीरजने तिरंदाजीचा सराव सुरू ठेवला. पण, कोरोनाच्या काळात वडिलांची नोकरी गेली आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीतही नीरज मागे हटला नाही आणि त्याने त्याच्या भावासोबत मिळेल ती कामे करुन कुटुंबाची जबाबदारी उचलण्याचे ठरवले. नीरजचा मोठा भाऊ सुनील चौहान बॉक्सर आहे. दोन्ही भावांनी मिळून कोरोनाच्या काळात भाजीपाल्याची गाडी लावून कुटुंब चालवले.
केंद्रीय मंत्र्यांनी केली मदत
या दोघांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही खेळाडूंना आर्थिक मदत केली होती. त्यानंतर नीरजची स्पोर्ट्स कोट्यातून ITBP मध्ये निवड झाली. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत स्पर्धेत निवड होणे, हा नीरज आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा यंदा नोव्हेंबरमध्ये जकार्ता येथे होणार आहेत. तर, एप्रिलमध्ये तुर्कीतील अँटालिया येथे विश्वचषक आणि जागतिक क्रीडा स्पर्धा यूएसए येथे होणार आहे. या तिन्ही स्पर्धांमध्ये नीरज भारताचे तिरंदाजीत प्रतिनिधीत्व करणार आहे.