Serena Williams Retirement: महिला टेनिस विश्वातील झंझावात आज थांबला? 'टेनिस सम्राज्ञी' सेरेना विल्यम्सची निवृत्तीची घोषणा! पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 10:41 AM2022-09-03T10:41:11+5:302022-09-03T10:45:55+5:30
कुरळे केस...धाकड शरीरयष्टी...फोरहँड, बॅकहँडमध्ये कमालीची ताकद आणि दुर्देम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आजवर तब्बल २३ ग्रँडस्लॅम नावावर करणाऱ्या सेनेना विल्यम्सचा झंझावात अखेर आज थांबला.
Serena Williams Retirement: महिला टेनिस विश्व जिच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कुरळे केस...धाकड शरीरयष्टी...फोरहँड, बॅकहँडमध्ये कमालीची ताकद आणि दुर्देम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आजवर तब्बल २३ ग्रँडस्लॅम नावावर करणाऱ्या सेनेना विल्यम्सचा झंझावात अखेर आज थांबला. अमेरिकन ओपनच्या तिसऱ्या फेरीत आज सेरेनाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यंदाची अमेरिकन ओपन स्पर्धा आपल्या करिअरची शेवटची स्पर्धा असणार असल्याचं सेनेनानं याआधीच जाहीर केलं होतं. सेरेनाचा आज ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉम्लजानोविक विरुद्धच्या सामन्यात 7-5, 6-7, 6-1 असा पराभव झाला. या पराभवानंतर सेनेनाचा तिच्या करिअरमधला शेवटचा सामना ठरला असल्याचं बोललं जात आहे.
सेरेनानं आजचा सामना गमावला असला तरी कोर्टवर आज तिच्याच नावाचा जल्लोष होत होता. सेरेनानंही सर्वांचं अभिवादन स्वीकारलं आणि आजवर दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. आता आईचं कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली आहे, असं म्हणत तिनं आपलं उर्वरित आयुष्य आता मुलीकडे लक्ष देणार असल्याचं सुतोवाच केलं. विशेष म्हणजे आपल्या आईचा शेवटचा सामना पाहण्यासाठी सेरेनाची चिमुकली देखील कोर्टवर उपस्थित होती. तसंच आई आणि लेकीनं मॅचिंग कपडे परिधान केले होते.
सोशल मीडियातही सेरेनावर दिग्गजांकडून अभिनंदनाचे आणि आभाराच्या पोस्ट केल्या जात आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनीही ट्विट करत सेरेनाचे आभार व्यक्त केले आहेत. मिशेल यांनी सेरेनाचा आजच्या सामन्याचा व्हिडिओ ट्विट करत तिच्या आजवरच्या प्रवासाचा उल्लेख करत कौतुक केलं आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे. तुझी प्रेरणा घेऊन अनेक युवा टेनिसपटू घडतील याची खात्री आम्हाला आहे, असं मिशेल ओबामा यांनी म्हटलं आहे.
Congrats on an amazing career, @SerenaWilliams!
— Michelle Obama (@MichelleObama) September 3, 2022
How lucky were we to be able to watch a young girl from Compton grow up to become one of the greatest athletes of all time.
I'm proud of you, my friend—and I can't wait to see the lives you continue to transform with your talents. pic.twitter.com/VWONEMAwz3
सेरेनाचे पुनरागमनाचेही संकेत
लक्षवेधी बाब अशी की अमेरिकन ओपनच्या आधी ही आपली शेवटची स्पर्धा असणार असल्याचं सेरेनानं जाहीर केलं होतं. पण आजच्या सामन्यातली पराभवानंतर बोलताना तिनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. सेरेनाला जेव्हा पुनरागमनाचा विचार आहे का असं विचारलं तेव्हा तिनं एक महत्वाचं विधान केलं. "भविष्यात काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. पण सध्या मी एका आईचं कर्तव्य पूर्ण करण्यास प्राधान्य देणार आहे. मला माझं आयुष्य जगायचं आहे", असं सेरेना म्हणाली. ऑस्ट्रेलियात खेळणं खूप आनंददायी असतं, असं म्हणत सेरेनानं सूतोवाच केलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेना दिसण्याचीही शक्यता आहे.
Serena Williams and Olympia wearing matching dresses 💎✨🥹 pic.twitter.com/IrbOa9j5bh
— ᴊᴇʟᴀ (@jelevision) August 30, 2022
यशाचे श्रेय बहीणीला
सेरेनाने तिची बहीण व्हीनस विल्यम्सचं कौतुक केलं. व्हीनस नसती तर सेरेना कधीच टेनिस खेळू शकली नसती, असं ती म्हणाली. सेरेनानं 2015 सालचं फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावणं ही तिची सर्वात मोठी कमाई असल्याचं सांगितलं. सेरेना तेव्हा फायनलपूर्वी खूप आजारी होती आणि न खेळण्याचा विचार करत होती. आजारी असतानाही तिनं अंतिम फेरीत खेळण्याचा निर्णय घेतला आणि लुसी सफारोव्हाचा 6-3, 6-7, 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावलं होतं.
THE GREATEST OF ALL TIME! Serena Williams is the GOAT ❤️ #SerenaWilliams#USOpenpic.twitter.com/SFlbA2vUsL
— 𝐳𝐢𝐞𝐫𝐫𝐚𝐡 ✿ (@JINS0N94) September 3, 2022
यूएस ओपनमध्येच पहिले ग्रँडस्लॅम जिंकलं
२३ वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेना विल्यम्सने १९९९ मध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती. हे तिच्या कारकिर्दीतील पहिलं ग्रँडस्लॅम ठरलं. त्यानंतर तिनं महिला दुहेरीत १४ ग्रँडस्लॅम आणि मिश्र दुहेरीत दोन ग्रँडस्लॅम जिंकले. त्याने चार वेळा ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. तिनं महिला एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारात राज्य केलं आणि पहिलं स्थान कायम राखलं. तिनं महिला एकेरीत एकूण ७३ विजेतेपद पटकावली आहेत.
सेरेनाची ग्रँड स्लॅम विजेतेपदं
- ऑस्ट्रेलियन ओपन- २००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५, २०१७
- फ्रेंच ओपन- २००२, २०१३, २०१५
- विम्बल्डन- २००२, २००३, २००९,२०१०, २०१२, २०१५, २०१६
- यूएस ओपन- १९९९, २००२, २००८, २०१३, २०१४