उसेन बोल्टचा विक्रमी ‘चौकार’
By admin | Published: February 16, 2017 12:18 AM2017-02-16T00:18:14+5:302017-02-16T00:18:14+5:30
वेगाचा बादशाह उसेन बोल्टने विक्रमी चौथ्यांदा लॉरेस जागतिक पुरस्कार सोहळ्यात वर्षातील ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कारावर कब्जा
मोनाको : वेगाचा बादशाह उसेन बोल्टने विक्रमी चौथ्यांदा लॉरेस जागतिक पुरस्कार सोहळ्यात वर्षातील ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कारावर कब्जा केला. यासह जागतिक विक्रमाची बरोबरी करताना बोल्टने ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लेब्रोन जेम्स या स्टार खेळाडूंना मागे टाकले. त्याचवेळी, जिमनॅस्ट सिमोन बाइल्स हिने महिला गटात बाजी मारली.
रिओ आॅलिम्पिक गाजवलेल्या बोल्ट आणि सिमोन या दोन्ही स्टार खेळाडूंचे जेव्हा आगमन झाले, तेव्हा मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचे स्वागत झाले. याआधी बोल्टने २००९, २०१० आणि २०१३ साली या पुरस्कारावर नाव कोरले होते. क्रीडा विश्वातील आॅस्कर मानला जाणारा हा पुरस्कार त्याने चौथ्यांदा पटकावला आहे. यासह त्याने रॉजर फेडरर, सेरेना विलियम्स आणि केली स्लेटर या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तित स्थान मिळवले.
हा पुरस्कार महान अॅथलिट मायकल जॉनसन यांच्या हस्ते स्वीकारल्यानंतर बोल्ट म्हणाला की, ‘या शानदार पुरस्कारासाठी धन्यवाद. लॉरेस पुरस्कार माझ्यासाठी मोठ्या पुरस्कारांपैकी एक असून चौथ्यांदा बाजी मारताना रॉजर फेडररसारख्या दिग्गजांची बरोबरी करणे माझ्यासाठी शानदार कामगिरी आहे.’
तसेच, सिमोन म्हणाली की, ‘माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. हा पुरस्कार मिळवणे सन्मानाची गोष्ट आहे. हा पुरस्कार माझ्यासह माझ्या गटातील सर्व नामांकित खेळाडूंसाठी आहे. आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्यासाठी प्रत्येक खेळाडूने सारखीच मेहनत घेतली आहे.’ त्याचवेळी सर्वकालीन महान जलतरणपटू अमेरिकेच्या मायकल फेल्प्सला ‘वर्षातील सर्वोत्तम पुनरागमन’ पुरस्काराने गौरविण्यात आले. (वृत्तसंस्था)