उथप्पा, गंभीरचा झंझावात; पुणे भुईसपाट
By admin | Published: April 26, 2017 11:26 PM2017-04-26T23:26:56+5:302017-04-27T06:19:30+5:30
कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोतकात्याने पुण्यावर सात विकेटने दणदणीत विजय मिळवला
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.26 - रॉबिन उथप्पा व कर्णधार गौतम गंभीर यांच्या झंझावातापुढे रायझिंग सुपरजायंट संघाचे आव्हान वाहून गेले. कोलकाता नाईट रायडर्सने ३ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा करीत विजय संपादन केला. आरसीबीला केवळ ४९ धावांमध्ये गुंडाळून ‘आयपीएल’च्या इतिहासातील विक्रमी कामगिरी करणाऱ्या कोलकाताने तोच धडाका कायम ठेवत पुण्याला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले. या विजयामुळे कोलकाताने गुण तालिकेत मुंबई इंडियन्सला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
रायझिंग सुपरजायंट पुण्याने दिलेल्या १८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सुनील नरेन व कर्णधार गौतम गंभीर यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पावित्रा घेतला. बिग बॅशमध्ये सलामीला येत यश संपादन केलेल्या वेस्ट इंडिजचा गोलंदाज नरेन याने नेहमीप्रमाणे आक्रमक फटकेबाजी केली. मात्र, बुधवारी त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्याने तीन चौकारांच्या साह्याने ११ चेंडूत १६ धावा केल्या. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ठाकूरच्या थेट फेकीवर तो धावबाद झाला.
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या रॉबिन उथप्पा यानेही आक्रमक फलंदाजीसच सुरुवात केली. इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर त्याचा सोपा झेल जयदेव उनाडकट याच्याकडून सुटला. यावेळी तो अवघ्या १२ धावांवर खेळत होता. त्यानंतर मात्र, त्याने पुण्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्याने अवघ्या २६ धावांत आपले अर्धशतक झळकावले. उथप्पाने मैदानाच्या चारही बाजूला नेत्रदीपक फटके मारले. दुसऱ्या बाजूने कर्णधार गौतम गंभीरने सावध फलंदाजी करीत उथप्पाला साथ दिली. त्यानेही ३५ चेंडूत पाच चौकार व एका षटकाराच्या साह्याने अर्धशतक झळकावले. उथप्पाने ४६ चेंडूंत सहा षटकार व सात चौकारांच्या साह्याने ८७ धावा केल्या. जिंकण्यासाठी अवघ्या पाच धावा आवश्यक असताना उनाडकटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्यांनतर लगेचच ख्रिस्तियनच्या चेंडूवर गंभीर झेलबाद झाला. गंभीरने ४६ चेंडूत एक षटकार व सहा चौकारांच्या साह्याने ६२ धावा केल्या. त्यांनतर आलेल्या ब्राव्हो व मनीष पांडे यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
(क्रीडा प्रतिनिधी)
धावफलक
रायझिंग पुणे सुपरजायंट : अजिंक्य रहाणे यष्टीचित उथप्पा गो. नरेन ४६, राहुल त्रिपाठी त्रिफळा गो. चावला ३८, स्टीव्ह स्मिथ नाबाद ५१, महेंद्रसिंग धोनी यष्टीचित उथप्पा गो. कुलदीप यादव २३, मनोज तिवारी यष्टीचित उथप्पा गो. कुलदीप यादव १, डॅनियल ख्रिस्तीयन झे. पांडे गो. यादव १६ ; अवांतर ७ एकूण २० षटकांत ५ बाद १८२; गोलंदाजी : उमेश यादव ३-०-२८-१, क्रिस वोक्स् ३-०-३८-०, सुनील नरेन ४-०-३४-१, ग्रँडोम २-०-१४-०, पीयूष चावला ४-०-३६-२, कुलदीप यादव ४-०-३१-२
कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नरेन धावचित (ठाकूर/धोनी) १६, गौतम गंभीर झे. ठाकूर गो. ख्रिस्तीयन ६२, रॉबिन उथप्पा झे. त्रिपाठी गो. उनाडकट ८७, डॅरेन ब्राव्हो नाबाद ६, मनीष पांडे नाबाद ०; अवांतर १३ एकूण १८.१ षटकांत ३ बाद १८४; गोलंदाजी : जयदेव उनाडकट ३-०-२६-१, शार्दुल ठाकूर ३.१-०-३१-०, वॉशिंग्टन सुंदर ३-०-३२-०, डॅनियल ख्रिस्तीयन ४-०-३१-१, इम्रान ताहीर ४-०-४८-०, राहुल त्रिपाठी १-०-१२-१.