युवीची फटकेबाजी अन् पाकिस्तानचे सरेंडर!

By admin | Published: June 5, 2017 06:21 AM2017-06-05T06:21:15+5:302017-06-05T06:21:15+5:30

अखेर आयसीसी चँम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानला हरवले

UV chattering and Pakistan surrender! | युवीची फटकेबाजी अन् पाकिस्तानचे सरेंडर!

युवीची फटकेबाजी अन् पाकिस्तानचे सरेंडर!

Next
>बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
अखेर आयसीसी चँम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानला हरवले. खरंतर पाकिस्तानचा संघ या लढतीत जिंकला नाही तरी भारताला कडवी टक्कर देईल, अशी अपेक्षा होती. पण विराटसेनेसमोर त्यांनी सरेंडर केले. सपशेल शरणागती पत्करली. 
या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आज भारताची फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानची गोलंदाजी अशी लढत होईल, अशी चर्चा होती. त्यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर सुरुवातीची दोनचार षटके तरी तसे वाटले. पण आधी धवन-रोहित आणि नंतर युवराज, कोहली आणि पांड्याने त्यांच्या गोलंदाजीचा पार पालापाचोळा केला.
खरंतर पावसामुळे ओलसर झालेली खेळपट्टी आणि ढगाळ वातावरण अशी वेगवान गोलंदाजीसाठी आदर्श परिस्थिती मैदानात होती. म्हणूनच की काय, शतकी सलामी दिली तरी धवन, रोहित आणि नंतर कोहली बराच काळ दबकून खेळले. धावगतीचा काटा काही केल्या साडेपाचच्या वर जात नव्हता. अशा परिस्थितीत भारताच्या डावाला कलाटणी दिली ती युवराज सिंगने. मिळालेल्या एका जिवदानाचा पूरेपूर फायदा उठवत त्याने पाकिस्तानी गोलंदाजीवर केलेला प्रतिहल्ला भारताच्या डावाला आणि सामन्याला कलाटणी देऊन गेला. युवीच्या फटकेबाजीमुळे भांबावलेल्या पाकिस्तानला हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात केलेल्या फटकेबाजीने पुरते दबावाखाली आणले.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग कळताना एकीकडे रिमझिम बरसणारा पाऊस आणि डकवर्थ/लुईसचे गणित यामुळे पाकिस्तानचा डाव कोलमडला. आघाडीची फळी कोसळल्यावर पाकिस्तानचे उर्वरित फलंदाज धावगतीच्या वाढत्या दबावाखाली दबून गेले. अखेर पावणे दोनशेच्या आतच त्यांचे काम तमाम झाले. आयसीसीच्या जागतिक स्पर्धेत भारतीय संघाच्या नावावर पाकिस्तानविरुद्धच्या अजून एका संस्मरणीय विजयाची नोंद झाली. आता आपल्या पुढच्या लढतीला चार दिवसांचा अवधी आहे. तोपर्यंत आपण पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करूया.

Web Title: UV chattering and Pakistan surrender!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.