युवी म्हणजे टीम इंडियाचा ‘एक्स फॅक्टर’

By admin | Published: June 6, 2017 05:05 AM2017-06-06T05:05:36+5:302017-06-06T05:05:36+5:30

भारताचा पाकवरील विजय अनपेक्षित नव्हे, तर वर्चस्वपूर्ण तसेच श्रेष्ठत्व सिद्ध करणारा ठरला

UV is Team India's 'X Factor' | युवी म्हणजे टीम इंडियाचा ‘एक्स फॅक्टर’

युवी म्हणजे टीम इंडियाचा ‘एक्स फॅक्टर’

Next

व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...
भारताचा पाकवरील विजय अनपेक्षित नव्हे, तर वर्चस्वपूर्ण तसेच श्रेष्ठत्व सिद्ध करणारा ठरला. सुरुवातीला फलंदाजांनी धडाका दाखविल्यानंतर गोलंदाजांनी स्वत:चे कर्तव्य चोखपणे बजावित काम सोपे केले. पावसाने हजेरी लावल्यानंतरही भारतीय खेळाडूंची लय मात्र कायमच होती. ही आत्मविश्वासाची नांदी आहे. या स्पर्धेत आम्ही जेतेपद राखण्यासाठीच आलो आहोत, हे दाखवून देण्याचे संकेत असावेत.
आघाडीच्या चारही फलंदाजांनी धावा काढल्या. मी मात्र युवराज सिंगच्या खेळीने प्रभावित झालो. तीन आठवड्यांनंतर युवीची बॅट तळपली असावी; पण या खेळीदरम्यान आपण मध्ये ‘फ्लॉप’ ठरल्याची कसर युवीने शिल्लक राखली नाही. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत युवीसारख्या खेळाडूकडून अशीच अपेक्षा आहे. त्याने मोठी फटकेबाजी करीत चाहत्यांना सुखावणारी कामगिरी केली आहे. युवी फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघ सुस्थितीत होताच, पण त्याने खेळाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संघाला ज्याची गरज होती ती गरज पूर्ण केली. युवीने पाकच्या माऱ्याची नाडी ओळखून जो खेळ केला, त्यामुळे मला त्याच्यातील जुना युवी पुन्हा पाहायला मिळाला. दुसरीकडे कोहलीला बॅट आणि चेंडू यामध्ये समन्वय साधण्यात थोडा त्रास जाणवत असताना युवीने दडपण झुगारून स्वमर्जीने फटकेबाजी केली. त्याने मारलेले फटके, कुठल्या क्षेत्रात फटकेबाजी करायची याचा घेतलेला वेध तसेच कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचे याचा ताळमेळ साधून युवीने धावा काढल्या. यासाठी तासन्तास नेटमध्ये घाम गाळावा लागतो. त्यानंतरच मनसोक्त फटकेबाजी करण्याचा आत्मविश्वास बळावतो आणि अधिकार प्राप्त होतो.
युवराज सिंग जेव्हा स्वत:चा नैसर्गिक खेळ करतो, तेव्हा तो शिखरावर असतो. गोलंदाजांना कसे चोपायचे याबद्दल सूर गवसला की, मग तो कुठलीही हयगय न करता किंवा दयामाया न दाखविता मोठे फटके मारतो. यातून युवीचा अनुभव आणि फलंदाजीतील मुरब्बीपणा नजरेस पडतो. आयपीएलदरम्यान आम्ही दोघांनी सनरायजर्स हैदराबादसाठी बरेच डावपेच आखले. यादरम्यान मला एक बाब पाहायला मिळाली, ती म्हणजे, युवीचा सकारात्मक दृष्टिकोन! हीच मोकळीक त्याच्या स्वत:च्या खेळीत पाहायला मिळणे हे भारतीय संघाच्या यशस्वी वाटचालीचे सुंदर संकेत ठरावेत. प्रत्येक संघाला कुठल्यातरी ‘एक्स फॅक्टर’ची गरज असते. भारतीय संघाची ही गरज युवी पूर्ण करतो. भूतकाळातही आम्हाला हे जाणवले. युवीने ज्या स्पर्धेत सुरुवातीपासून धडाकेबाज कामगिरी केली, ती स्पर्धा भारतासाठी उत्कृष्ट ठरली हे देखील अनुभवले आहे.
याशिवाय माझ्या दृष्टीने नेत्रदीपक ठरलेली बाब म्हणजे अर्थात संघातील लवचिकपणा. धोनीला थांबवून हार्दिक पांड्याला अग्रक्रम देणे हा ‘मास्टर स्ट्रोक’ ठरला. हार्दिकने झटपट धावा काढायच्या कशा, हे उत्तुंग फटकेबाजीतून सिद्ध केले.
भारतीय संघ जागतिक क्रिकेटमध्ये चांगले क्षेत्ररक्षण करणारा संघ अशी ओळख निर्माण करीत आहे. तरीही सुधारणेस वाव आहे, असे जाणवले. पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध होईल तेव्हा क्षेत्ररक्षणात कुठलाही गाफीलपणा परवडणारा नसेल. त्यादृष्टीने कंबर कसायला हवी. (गेमप्लान)

Web Title: UV is Team India's 'X Factor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.