विराटला साधं सॉरीचं स्पेलिंगही माहित नसेल, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रमुखांचं वक्तव्य
By admin | Published: March 23, 2017 02:28 PM2017-03-23T14:28:49+5:302017-03-23T14:37:34+5:30
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनी पुन्हा एकदा विराट कोहलीवर निशाणा साधत पुन्हा एकदा वादाला तोंड फोडलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - डीआरएस प्रकरणावरुन भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मैदानाबाहेर सुरु झालेला सामना अद्यापही संपला नसल्याचं चित्र आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनी पुन्हा एकदा विराट कोहलीवर निशाणा साधत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. कोहलीला सॉरी म्हणता येत नाही, एवढचं नव्हे तर त्याला सॉरीची स्पेलिंगही माहित नसेल, असं वक्तव्य सदरलँड यांनी केलं आहे. एका रेडिओ स्टेशनशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
तिस-या कसोटी सामन्याआधी सुरु झालेल्या या वादातून खेळाडू बाहेर पडले असून त्यांनी खेळाला महत्व देण्याचा निर्णय घेतला असला तरी मैदानाबाहेरील खेळाडू मात्र हा अद्याप शमवू देण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियन मीडिया विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागले असताना आता पुन्हा एकदा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनी या वादात उडी घेतली आहे.
बंगळुरु कसोटीत विराटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर डीआरएसप्रकरणी जाहीर टीका केली होती. यानंतर जेम्स सदरलँड यांनी स्टीव्ह स्मिथचा बचाव करत पुढे सरसावले होते. ते म्हणाले होते, 'स्टीव्ह स्मिथ हा गुणवान खेळाडू असून, त्याचं व्यक्तिमत्त्वंही चांगलं आहे. उत्तम खेळ आणि चांगल्या व्यवहारामुळे अनेक लोकांसाठी तो आदर्श आहे. बंगळुरू टेस्टमध्ये रिव्ह्यूच्या वेळी जे काही झालं ते स्टीव्ह स्मिथनं जाणूनबुजून केलं नाही'. यावेळी बोलताना त्यांनी विराट कोहलीवर निशाणा साधत 'विराट आणि टीम इंडियाकडून स्मिथवर लावण्यात आलेले आरोप आश्चर्यचकित करणारे आहेत', असं म्हटलं होतं. 'विराटनं स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाची टीम, ड्रेसिंग रूमवर लावलेल्या आरोपांमुळे त्यांच्याच प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची', टीका त्यांनी केली.
भारताचा कर्णधार विराट कोहली याला ऑस्ट्रेलियन मीडियाने जबर टार्गेट केले आहे. ऑस्ट्रेलियातील ‘डेली टेलिग्राफ’मधील वृत्तात कोहलीची तुलना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी कोहलीला समर्थन दिलं. 'ऑस्ट्रेलियन मीडिया विराटला क्रीडाविश्वातील डोनाल्ड ट्रम्प असा उल्लेख करत आहे. त्याला विजेता आणि प्रेसिडेंट मानल्याबद्द आभार!', असे ट्विट करुन बिग बींना विराटला समर्थन दिलं.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यानेही विराटला पाठिंबा दिला. आमचे दोन-तीन पत्रकार तर विराटची प्रतिमा धुळीस मिळविण्याच्या नेहमीच प्रयत्नात असतात, असे मत माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने व्यक्त करीत अप्रत्यक्षरीत्या विराटला पाठिंबा दिला.
काय आहे डीआरएस वाद?
बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ पायचीत असल्याचं अपील पंचांनी उचलून धरलं, त्या वेळी स्मिथने डीआरएसचा कौल मागण्यासाठी ड्रेसिंग रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांकडे सहाय्याची अपेक्षा केली होती. भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याविरोधात पंचाकंडे तक्रार केली. त्यामुळे उभय कर्णधारांमध्ये वादाची ठिणगी पडली. बंगळुरू कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने स्मिथच्या त्या कृतीवर जाहीर टीका केली.