वेदने ६४ घरांच्या राजाला झुंजविले; विश्वनाथन आनंदविरुद्ध एक तास ४९ मिनिटे दिली लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:13 AM2023-08-16T10:13:11+5:302023-08-16T10:14:46+5:30
शेवटपर्यंत म्हणजे तब्बल एक तास ४९ मिनिटे मुंबईचा वेद आंब्रेने त्याच्याशी लढा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ‘त्या’ २२ जणांच्या मनात प्रचंड धाकधूक होती; पण ज्याला आदर्श मानून बुद्धिबळाच्या चाली शिकले, त्याच ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदविरुद्ध खेळण्याची त्यांच्यासाठी पर्वणी होती. आनंद या २२ जणांसोबत एकाच वेळी खेळला. आनंदची खेळी काहींना बुचकळ्यात पाडणारी होती, तर काहींना हार पत्करावी लागत होती. शेवटपर्यंत म्हणजे तब्बल एक तास ४९ मिनिटे मुंबईचा वेद आंब्रेने त्याच्याशी लढा दिला.
शेवटच्या क्षणाला वेदकडून एक चूक झाली आणि तो पराभूत झाला. मात्र, पराभवापेक्षा आनंदसोबत खेळलो हीच मोठी गोष्ट असल्याची भावना वेदने ‘लोकमत’कडे व्यक्त केली. स्वातंत्र्यदिनी मंगळवारी ठाण्यातील एका मॉलमध्ये आनंद एकाच वेळी २२ बुद्धिबळपटूंशी खेळला. काही चिमुकलेही आनंदसोबत खेळत होते. आनंद बुद्धिबळपटूंसाठी आदर्श असल्याने त्याच्यासाठी ठाणेकरांची गर्दी झाली होती. हार-जीतपेक्षा आनंदसोबत खेळणे, हे प्रत्येकासाठी स्वप्नपूर्ती होती.
दुपारी दोन वाजता खेळाला सुरुवात झाली. एकेक जण हरत होता, पण शेवटपर्यंत टिकून राहिला तो वेद. तीन वाजून ४९ मिनिटांनी वेद पराभूत झाला, पण त्याने ६४ घरांच्या राजाला प्रभावित केले होते. पराभवानंतर ‘मी कुठे चुकलो, असे आनंद सरांना विचारले आणि त्यांनीही योग्य मार्गदर्शन केले,’ असे वेद म्हणाला. ठाण्याचा अथर्व आपटे यानेही आनंदकडून मोलाच्या टिप्स घेतल्या.
यंदाचा विश्वचषक भारतासाठी ऐतिहासिक
बुद्धिबळ आव्हानात्मक आहे. या २२ स्पर्धकांसोबत खेळताना मजा आली. ठाण्यात अशी स्पर्धा झाल्याचे कौतुक आहे. मी सर्वांसोबत एक सामान्य खेळ खेळला. विश्वचषक बुद्धिबळात भारतीयांनी ऐतिहासिक कामगिरी केली असून, पहिल्यांदाच आपले चार खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत पोहचले. सर्वजण अंतिम फेरी गाठण्याची क्षमता राखून आहेत. - विश्वनाथन आनंद