वेंगसरकर यांनी उपाध्यक्षपदाचा दिला राजीनामा
By admin | Published: January 5, 2017 02:25 AM2017-01-05T02:25:39+5:302017-01-05T02:25:39+5:30
सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिलेल्या दणक्यानंतर संलंग्न राज्य संघटना हादरले असताना मुंबई क्रिकेट संघटनेतही (एमसीए) बदल होण्यास सुरुवात झाली
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिलेल्या दणक्यानंतर संलंग्न राज्य संघटना हादरले असताना मुंबई क्रिकेट संघटनेतही (एमसीए) बदल होण्यास सुरुवात झाली. एमसीएचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
विशेष म्हणजे बुधवारीच, मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे (एमपीसीए) चेअरमन ज्योतिरादित्य शिंदे आणि अध्यक्ष संजय जगदळे यांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर वेंगसरकर यांनीही आपला राजीनामा दिला. वेंगसरकर यांनी २००२ ते २०१० या काळात एमसीए उपाध्यक्षपदी होते. २०११ साली अध्यक्षपदाच्या निवडणूकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरुध्द वेंगसरकर पराभूत झाले होते. यानंतर ते चार वर्षांनी पुन्हा एमसीएत उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. एमसीएला एका पत्राद्वारे वेंगसरकर यांनी कळविले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मी एमसीएच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.’ याआधी १७ डिसेंबरला जेष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. (प्रतिनिधी)