व्हिनस, गर्बाइन अंतिम फेरीत

By admin | Published: July 14, 2017 12:57 AM2017-07-14T00:57:38+5:302017-07-14T00:57:38+5:30

स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझाने कारकिर्दीत दुसऱ्यांदा विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Venus, Garben in the final round | व्हिनस, गर्बाइन अंतिम फेरीत

व्हिनस, गर्बाइन अंतिम फेरीत

Next

लंडन : अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात जबरदस्त आक्रमक खेळ केलेल्या स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझाने कारकिर्दीत दुसऱ्यांदा विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत ८७व्या स्थानी असलेल्या स्लोवाकियाच्या मग्दालेना रीबारिकोवा हिचा मुरुरुझाने सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. दुसरीकडे, अमेरिकेची दिग्गज व्हिनस विलियम्सने नवव्यांदा अंतिम फेरी गाठताना ब्रिटनच्या जोनाथन कोंटाचा पराभव केला.
याआधी २०१५ साली मुगुरुझा विम्बल्डनमध्ये उपविजेती ठरली होती. यंदा स्टार खेळाडू सेरेना विलियम्स आणि मारिया शारापोवा यांच्या अनुपस्थितीमध्ये मुगुरुझाला पहिले विम्बल्डन जेतेपद जिंकण्याची नामी संधी असेल. त्याच वेळी, अंतिम फेरीत तिच्यापुढे अमेरिकेची दिग्गज व्हिनस विलियम्सचे तगडे आव्हान असल्याने मुगुरुझाला विजय मिळवणे खूप कठीण जाईल. उपांत्य फेरीत मुगुरुझाने अपेक्षित विजय मिळवताना आपल्याहून अनुभवात कमी असलेल्या रीबारिकोवाचा ६-१, ६-१ असा फडशा पाडला. केवळ १ तास ५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुगुरुझाच्या धडाक्यापुढे रीबारिकोवाचा काहीच निभाव लागला नाही. रीबारिकोवाने केलेल्या अनेक चुकांचा फायदा मुगुरुझाला झाल्याने तिला अंतिम फेरी गाठण्यात काहीच त्रास झाला नाही. दरम्यान, दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या मुगुरुझाला याआधी २०१५ साली बलाढ्य सेरेना विलियम्सविरुद्ध पराभव झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्याच वेळी, बिगरमानांकित दुसरीकडे रीबारिकोवाने स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करताना पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली होती. कोणत्याही ग्रँडस्लॅममध्ये रीबारिकोवाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. २००८ पासून रीबारिकोवा सलग दहाव्यांदा विम्बल्डनमध्ये सहभागी झाली असून, २००८ ते २०१४ मध्ये ती पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. तसेच, २०१५ साली तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर २०१६मध्ये पुन्हा ती पहिल्या फेरीतूनच स्पर्धेबाहेर पडली. यंदा मात्र रीबारिकोवाने लक्षवेधी कामगिरीसह उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. अन्य उपांत्य सामन्यात व्हिनसने अपेक्षित बाजी मारताना कोंटाचा ६-४, ६-२ असा धुव्वा उडवला. स्पर्धेत कोंटाला सहावे, तर व्हिनसला १०वे मानांकन होते. विशेष म्हणजे, या पराभवासह १९७७ सालानंतर अंतिम फेरी गाठणारी पहिली ब्रिटिश महिला खेळाडू बनण्याचे कोंटाचे स्वप्नही धुळीस मिळाले. आता, व्हिनस आठवे ग्रँडस्लॅम आणि सहावे विम्बल्डन जिंकण्यासाठी शनिवारी मुगुरुझाविरुद्ध लढेल. (वृत्तसंस्था)
>सानिया बाद, बोपन्ना उपांत्यपूर्व फेरीत
मिश्र दुहेरीत भारतासाठी तिसरी फेरी संमिश्र ठरली. दुहेरीनंतर मिश्र दुहेरीमध्येही सानिया मिर्झाचे आव्हान संपुष्टात आले असून दुसरीकडे अनुभवी खेळाडू रोहन बोपन्नाने आपल्या साथीदारासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सानिया आणि तिचा कॅनेडियन साथीदार इवान डोडिग यांना हेन्री काँटिनेन (फिनलँड) - हिथर वॉटसन (ब्रिटन) या गतविजेत्यांविरुद्ध ६-७, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. त्याच वेळी, रोहन बोपन्नाने कॅनडाच्या गॅब्रियला डाब्रोवस्कीसह खेळताना निकोला मेकटिच-अन्ना कोंजू या क्रोएशियाच्या दहाव्या मानांकित जोडीला ७-६, ६-२ असे पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत बोपन्ना-डाब्रोवस्की जोडी काँटिनेन-वॉटसन यांच्याविरुद्ध भिडेल.

Web Title: Venus, Garben in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.