वर्मा बंधूंची उपांत्य फेरीत धडक
By admin | Published: November 5, 2016 05:29 AM2016-11-05T05:29:28+5:302016-11-05T05:29:28+5:30
भारताच्या समीर आणि सौरभ या वर्मा बंधूंनी धमाकेदार खेळ करताना बिट्सबर्गर ओपन ग्राप्री गोल्ड बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठली
सारब्रुकेन (जर्मनी) : भारताच्या समीर आणि सौरभ या वर्मा बंधूंनी धमाकेदार खेळ करताना बिट्सबर्गर ओपन ग्राप्री गोल्ड बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरी गाठली. एकतर्फी झालेल्या उपांत्यपुर्व सामन्यात समीरने यूक्रेनच्या आर्टेम पोचतारोवला २-० असे सहज लोळवून दिमाखात आगेकूच केली. तर, त्याचा मोठा भाऊ सौरभने झुंजार खेळाचे प्रदर्शन करुन उपांत्य फेरी निश्चित केली. एकूणच स्पर्धेत वर्मा बंधूंनी चांगलीच चमक दाखवताना सर्वांचे लक्ष वेधले आहे.
१२व्या मानांकीत समीरने पोचतारोवला केवळ ३५ मिनिटांमध्ये पराभूत केले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना त्याने पोचतारोवचा २१-१४, २१-१६ असा धुव्वा उडवून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत ४४व्या स्थानी असलेल्या समीरने पहिल्यांदाच पोचतारोवचा सामना केला.अ पोचतारोव जागातिक क्रमवारीत ६८व्या स्थानी आहे.
पहिल्या गेममध्ये धडाकेबाज सुरुवात करताना समीरने सलग ७ गुणांची कमाई करताना ९-४ अशी आघाडी घेतली होती. यानंतर मजबूत आघाडी घेताना त्याने पहिला गेम २१-१४ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये समीरला काहीप्रमाणात कडवी झुंज मिळाली. १७-१६ अशा नाममात्र आघाडीवर असताना समीरने सलग चार गुणांची वसूली करत दुसरा गेम २१-१६ असा जिंकून उपांत्य फेरी निश्चित केली.
दुसरीकडे, नुकताच चीनी तैपई ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या सौरभने आपला धडाका कायम राखताना जर्मनीच्या मार्क ज्वैबलरला तीन गेमच्या अटीतटीच्या लढतीत २१-१५, १६-२१, २१-१५ असे नमवले. ५१ मिनिटांमध्ये रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना सौरभने पुरुष एकेरीत भारतीयांचे दुहेरी आव्हान कायम राखले.
पहिला गेम सहजपणे जिंकून आघाडी घेतलेल्या सौरभला दुसऱ्या गेममध्ये ज्वैबलरकडून कडवी झुंज मिळाली. यावेळी ज्वैबलरने हा गेम जिंकत सामना बरोबरीत आणला. यानंतर निर्णायक तिसऱ्या गेममध्ये मात्र सावध व संयमी खेळ करताना मोक्याच्यावेळी आक्रमक फटके मारत सौरभने ज्वैबलरला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.
त्याचवेळी, मिश्र युगुलमध्ये मात्र भारताच्या पदरी निराशा आली. प्राजक्ता सावंत आणि योगेंद्रन कृष्णन यांना कियान मेंग टान - पेई जिंग लाई या चौथ्या मानांकीत मलेशियन जोडीविरुध्द १५-२१, ११-२१ असे पराभूत व्हावे लागले. (वृत्तसंस्था)