बिटबर्गर ओपनमध्ये वर्मा बंधू करणार प्रतिनिधित्व
By admin | Published: November 1, 2016 02:19 AM2016-11-01T02:19:23+5:302016-11-01T02:19:23+5:30
भारताचा सौरव वर्मा आणि समीर वर्मा मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या बिटबर्गर ओपन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान सांभाळणार आहेत.
सारब्रकेन : भारताचा सौरव वर्मा आणि समीर वर्मा मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या बिटबर्गर ओपन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान सांभाळणार आहेत. या महिन्याच्या सुुरुवातीला चीन ताइपेमध्ये जेतेपद पटकावणारा सौरव व यंदा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेला त्याचा धाकटा बंधू समीर मंगळवारी पात्रता फेरीचा अडथळा पार करणाऱ्या खेळाडूविरुद्ध सुरुवात करतील. पुरुष एकेरीत सिरिल वर्माला सहाव्या मानांकित इंडोनेशियाच्या मौलाना मुस्तफाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे तर आनंद पवारची लढत तिसऱ्या मानांकित जर्मनीच्या ज्विबलेरविरुद्ध होईल. शुभांकर डेला इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. महिला एकेरीत रुत्विका शिवानी गाडेची लढत नेदरलँडच्या सोराया डे विशसोबत होईल तर तन्वी लाडला नेदरलँडच्या गेल मेहुलेटच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पुरुष दुहेरीत अक्षय देवाळकर व कोना तरुण यांची लढत जर्मनीच्या मायकल फुश व जोहानेस शोटलेससोबत होईल. प्राजक्ता सावंत व मलेशियाची के झि किंग ली यांना डेन्मार्कच्या ज्युली फिन इप्सेन व रिक्के सोबी हानसेन यांच्या अव्हाानाला सामोरे जावे लागेल. (वृत्तसंस्था)