दिग्गजांची निवृत्ती चटका लावणारी
By Admin | Published: August 22, 2016 04:45 AM2016-08-22T04:45:26+5:302016-08-22T04:45:26+5:30
जलतरणपटू मायकल फेल्प्स यांनी आजतागयत पटकावलेल्या आॅलिम्पिक सुवर्णपदकांमुळे आॅलिम्पिकचे चित्रच बदलले आहे.
रिओ : वेगवान धावपटू उसेन बोल्ट आणि महान जलतरणपटू मायकल फेल्प्स यांनी आजतागयत पटकावलेल्या आॅलिम्पिक सुवर्णपदकांमुळे आॅलिम्पिकचे चित्रच बदलले आहे. रिओत क्रीडा महाकुंभामध्ये अखेरचा सहभाग नोंदवणाऱ्या या दोन महान खेळाडूंची निवृत्ती चटका लावून जाणारी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांनी या दोन्ही खेळाडूंना ‘महानायक’ संबोधले आहे, पण ३१ व्या आॅलिम्पिकच्या समारोपानंतर त्यांची उणीव कशी भरून काढायची हा विचार नक्कीच त्यांच्या मनाला शिवून जाईल. ३० वर्षीय बोल्टने ९ तर ३१ वर्षीय फेल्प्सने २३ सुवर्णपदके पटकावली आहेत.
शनिवारी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना बाक म्हणाले,‘आम्ही असे खेळाडू बघितले आहेत की ते येथे येण्यापूर्वीच महानायक ठरले होते. त्यांनी आपले हे पद अधिक अढळ केले. त्यात मायकल फेल्प्स व उसेन बोल्ट यांचा समावेश आहे.’
या दोन्ही खेळाडूंनी पदार्पणाच्या स्पर्धेपासून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. १५ वर्षांच्या फेल्प्सने २००० च्या सिडनी आॅलिम्पिकमध्ये प्रथमच सहभाग नोंदवला होता तर १७ वर्षांच्या बोल्टने २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये २०० मीटरच्या दौड शर्यतीत हिटमध्ये पाचवे स्थान पटकावले होते.
अथेन्स आॅलिम्पिकमध्ये फेल्प्सने चमकदार कामगिरी करताना सहा सुवर्णपदके आणि दोन कांस्य पदके पटकावताना मार्क स्प्ट््िजच्या सात जेतेपदाच्या विक्रमाला आव्हान दिले होते. २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये फेल्प्सने जलतरणात सर्व ८ स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावित इतिहास नोंदवला तर बोल्टने तेथे १०० मीटर, २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर दौड स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळवताना बडर्््स नेस्ट स्टेडियममध्ये चाहत्यांचे लक्ष वेधले होते.
२०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये बोल्टने पुन्हा एकदा तिन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली तर फेल्प्सने आपल्या खात्यात आणखी चार सुवर्णपदकांची भर घातली.
रिओमध्ये पाच सुवर्णपदके पटकावताना अमेरिकन जलतरणपटूने २३ सुवर्णपदकांसह आपल्या पदकांची एकूण संख्या २८ केली तर बोल्टने पुन्हा तिन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावण्याची कामगिरी केली. बोल्टच्या नावावर आॅलिम्पिकमध्ये ९ सुवर्णपदकांची नोंद आहे.
बोल्टने म्हणाला, ‘मी महान खेळाडू असल्याचे सिद्ध केले आहे.’ फेल्प्स म्हणाला,‘एक खेळाडू म्हणून मी यापूर्वी जे कुणाला करता आले नाही, असे लक्ष्य ठरवले होते. आज मी माझ्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्यात मी यशस्वी झाल्याचे वाटते.’
>आॅलिम्पिकचे ‘बादशाह’
मायकल फेल्प्स
२००४ अथेन्स
६ सुवर्ण, २ कांस्य
२००८ बीजिंग
८ सुवर्ण
२०१२ लंडन
४ सुवर्ण, २ रौप्य
२०१६ रिओ
५ सुवर्ण, १ रौप्य
>उसेन बोल्ट
२००८ बीजिंग
३ सुवर्ण
२०१२ लंडन
३ सुवर्ण
२०१६ रिओ
३ सुवर्ण