भारतीय युवांचा दणदणीत विजय
By admin | Published: February 2, 2017 12:10 AM2017-02-02T00:10:30+5:302017-02-02T00:10:30+5:30
पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा पुरेपुर हिशोब चुकता करताना भारताच्या युवा संघाने इंग्लंडचा तब्बल १२९ धावांनी धुव्वा उडवताना १९ वर्षांखालील एकदिवसीय मालिकेत
मुंबई : पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा पुरेपुर हिशोब चुकता करताना भारताच्या युवा संघाने इंग्लंडचा तब्बल १२९ धावांनी धुव्वा उडवताना १९ वर्षांखालील एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. हार्विक देसाई (७५) आणि हिमांशू राणा (५८) यांच्या दमदार फलंदाजीनंतर अनुकुल रॉयच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने बाजी मारली.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने सावध सुरुवातीनंतर हिमांश राणा आणि हार्विक देसाई यांच्या जोरावर निर्धारीत ५० षटकात ८ बाद २८७ धावांची आव्हानात्मक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा भारतीयांनी केवळ १५८ धावांत खुर्दा पाडून दिमाखात विजय मिळवला.
अनुकुल रॉयने ३४ धावांत ३ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तसेच, शिवम मावी (२/१३) आणि इशान पोरेल (२/३३) यांनी देखील चांगला मारा केला. इंग्लंडकडून डेलरे रोलिन्स याने पुन्हा फलंदाजीत चमक दाखवताना ३५ चेंडूत सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, अडखळत सुरुवात केलेल्या भारताला देसाई व राणा यांनी सावरले. राणाने ६६ चेंडूत १० चौकारांसह ५८ धावा काढल्या. तसेच, देसाईने ६२ चेंडूत १० चौकारांसह ७५ धावांचा तडाखा दिला. (क्रीडा प्रतिनिधी)
संक्षिप्त धावफलक :
भारत (१९ वर्षांखालील) : ५० षटकात ८ बाद २८७ धावा. (हार्विक देसाई ७५, हिमांशू राणा ५८; मॅथ्यू फिशर ४/४४, हेन्री ब्रूक्स ३/६०) वि. वि. इंग्लंड (१९ वर्षांखालील) : ३३.४ षटकात सर्वबाद १५८ धावा. (डेलरे रॉलिन्स ४६, हॅरी ब्रूक्स २६, आॅली पोप २४; अनुकुल रॉय ३/३४, शिवम मावी २/१३, इशान पोरेल २/३३)