मुंबईकरांचा दणदणीत विजय

By admin | Published: November 9, 2016 04:39 AM2016-11-09T04:39:08+5:302016-11-09T04:39:08+5:30

गतविजेत्या मुंबईने रेल्वेकडून मिळालेले अवघे २४ धावांचे लक्ष्य एकही फलंदाज न गमावताना सहजपणे साध्य करुन रणजी ट्रॉफी स्पर्धेत १० विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला.

Victory of Mumbaikars | मुंबईकरांचा दणदणीत विजय

मुंबईकरांचा दणदणीत विजय

Next

म्हैसूर : गतविजेत्या मुंबईने रेल्वेकडून मिळालेले अवघे २४ धावांचे लक्ष्य एकही फलंदाज न गमावताना सहजपणे साध्य करुन रणजी ट्रॉफी स्पर्धेत १० विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. या दणदणीत विजयासह मुंबईकरांनी बोनस गुणाच्या कमाईसह ७ गुणांची वसूली करत ‘अ’ गटात पुन्हा एकदा अग्रस्थान मिळवले आहे.
पहिल्या डावात रेल्वेला १८५ धावांनी पिछाडीवर टाकल्यानंतर मुंबईने रेल्वेला दुसऱ्या २०८ धावांमध्ये गुंडाळले. यासह मिळालेले २४ धावांचे लक्ष्य मुंबईने अवघ्या ५ षटकात एकही फलंदाज न गमावता पार केले. अखिल हेरवाडकरने १४ चेंडूत ४ चौकारासह नाबाद १८ धावा फटकावल्या. तर, श्रेयश अय्यरने १६ चेंडूत एका चौकारासह नाबाद ६ धावा काढल्या.
तत्पूर्वी, चौथ्या दिवशी रेल्वेने ४ बाद १३५ धावांवरुन सुरुवात केली. युवा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने टिच्चून मारा करीत रेल्वेच्या फलंदाजांना तंबूतला रस्ता दाखवला. त्याने केवळ ३५ धावांत ५ बळी घेत रेल्वेच्या आव्हानातली हवा काढली. तसेच, पहिल्या डावात रेल्वेचा कर्दनकाळ ठरलेल्या विजय गोहिलने २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. रेल्वेकडून सौरभ वाकसकर (३९), अरिंदम घोष (३१), फैझ अहमद (२८) आणि आशिष यादव (२६) यांनीच थोडाफार प्रतिकार केला.
तुषारच्या भेदकतेपुढे रेल्वेचा डाव ९२.१ षटकात २०८ धावांमध्ये संपुष्टात आला. यासह मुंबईने ‘अ’ गटात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावताना बोनस गुणासह सर्वाधिक १९ गुणांची मिळवले आहेत. मुंबईचा पुढील सामना १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान उत्तर प्रदेश विरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)


मुंबई (पहिला डाव) : १३३.२ षटकात सर्वबाद ३४५ धावा.
रेल्वे (पहिला डाव) : ७०.३ षटकात सर्वबाद १६० धावा (कर्ण शर्मा २४, आशिष सिंग २२; विजय गोहिल ५/६४)
रेल्वे (दुसरा डाव) : ९२.१ षटकात सर्वबाद २०८ धावा (सौरभ वाकासकर ३९, अरिंदम घोष ३१; तुषार देशपांडे ५/३५)
मुंबई (दुसरा डाव) : ५ षटकात बिनबाद २४ धावा (अखिल हेरवाडकर नाबाद १८, श्रेयश अय्यर नाबाद ६)

Web Title: Victory of Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.