पंजाब, मिझोरामचे विजय
By Admin | Published: March 14, 2017 12:44 AM2017-03-14T00:44:15+5:302017-03-14T00:44:15+5:30
देशातील सर्वात जुन्या स्पर्धेपैकी एक असलेल्या ७१ व्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी पंजाब आणि मिझोराम संघांनी विजय नोंदवले
पणजी : देशातील सर्वात जुन्या स्पर्धेपैकी एक असलेल्या ७१ व्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी पंजाब आणि मिझोराम संघांनी विजय नोंदवले. मिझोरामने महाराष्ट्राचा ३-१ ने तर पंजाबने रेल्वेचा २-१ ने पराभव केला. याबराबेरच या दोन्ही संघांनी स्पर्धेत आगेकूच केली आहे.
बांबोळी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात मिझोरामने महाराष्ट्र संघावर सुरुवातीपासून वर्चस्व राखले. त्यांनी अवघ्या ८ व्या मिनिटाला आघाडी मिळवली होती. लालचुआवानामा वॉचाँगने हा शानदार गोल नोंदवला. त्यानंतर चार मिनिटांच्या अंतराने महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील राहुल दास याने बरोबरी साधणारा गोल नोंदवला. महाराष्ट्राचा हा आनंद फार काळ टिकला नाही. मिझोरामच्या लालफाझुआला याने ४४ व्या मिनिटाला गोल नोंदवला. त्यामुळे त्यांनी पुन्हा आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यंत मिझोराम २-१ अशा आघाडीवर होता. त्यानंतर लालारिप्युआ याने ५५ व्या मिनिटाला शाानदार गोल नोंदवला आणि मिझोरामच्या ३-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.
नावेली येथील मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात, पंजाब संघाने रेल्वेचा २-१ ने पराभव केला. ‘ब’ गटातील अंतिम लीगमधील या सामन्यात पंजाबाने वर्चस्व राखले. पंजाबकडून राजबीर सिंहने १६ व्या आणि ६१ व्या मिनिटाला गोल नोंदवले. रेल्वेकडून राजेश सूसानायकम याने ५९ व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवला. पंजाबचा संघ मध्यंतरापर्यंत १-० अशा आघाडीवर होता. (क्रीडा प्रतिनिधी)