विजयी सीमोल्लंघनाची हॅट्ट्रिक

By admin | Published: October 12, 2016 07:04 AM2016-10-12T07:04:13+5:302016-10-12T07:04:13+5:30

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला चेतेश्वर पुजाराने (१०१*) झळकावलेल्या नाबाद शतकानंतर हुकमी एक्का रविचंद्रन आश्विनने (७/५९) केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर

Victory Seamolglaghna's hat-trick | विजयी सीमोल्लंघनाची हॅट्ट्रिक

विजयी सीमोल्लंघनाची हॅट्ट्रिक

Next

इंदूर : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला चेतेश्वर पुजाराने (१०१*) झळकावलेल्या नाबाद शतकानंतर हुकमी एक्का रविचंद्रन आश्विनने (७/५९) केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने चौथ्या दिवशीच बाजी मारताना न्यूझीलंडचा तब्बल ३२१ धावांनी फडशा पाडला. या दणदणीत विजयासह टीम इंडियाने किवींना क्लीन स्वीप देतानाच आयसीसी क्रमवारीतील आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले. शिवाय, या वेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मानाची गदादेखील सुपूर्त केली.
टीम इंडियाने या विजयासह कसोटी सामन्यात धावांच्या बाबतीत आपला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा विजय साकारला. त्याचबरोबर इंदूरच्या होळकर स्टेडियममध्येही भारताने आपली विजयी कामगिरी कायम राखली. याआधी होळकर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या चारही एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने बाजी मारली होती.
पुजाराने झळकावलेल्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव ३ बाद २१६ धावांवर घोषित करून न्यूझीलंडला विजयासाठी ४७५ धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. या आव्हानाखाली सुरुवातीपासून दबलेल्या न्यूझीलंडचा डाव ४४.५ षटकांत १५३ धावांवर गडगडला. पहिल्या डावात ८१ धावांत ६ बळी घेणाऱ्या आश्विनने दुसऱ्या डावातही आपला जलवा दाखवताना १३.५ षटके गोलंदाजी करून ५९ धावांत ७ बळी घेऊन किवींना चांगलेच गुडघे टेकण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे, आश्विनने आपल्या कारकिर्दीमध्ये सहाव्यांदा सामन्यात १० किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची किमया केली. सामन्यात सर्वाधिक १३ बळी घेऊन आश्विनने सामनावीरासह मालिकावीराचा किताबही पटकावला.
न्यूझीलंडला २९९ धावांत गारद करून २५८ धावांची आघाडी घेतलेल्या यजमानांनी पुजाराचे शतक आणि दोन वर्षांनी पुनरागमन केलेल्या गौतम गंभीरच्या (५०) अर्धशतकाच्या जोरावर दुसरा डाव ३ बाद २१६ धावांवर घोषित करून न्यूझीलंडला विजयासाठी ४७५ धावांचे लक्ष्य दिले. पुजाराने १४८ चेंडूंत ९ चौकारांसह खेळी सजवली, तर गंभीरने ५६ चेंडंूत ६ चौकारांसह अर्धशतक झळकावले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे फलंदाज सुरुवातीपासूनच दडपणाखाली आले. त्यांनी दडपण झुगारण्याचा प्रयत्न करताना एक वेळ आक्रमक पवित्राही घेतला. परंतु, आश्विन आणि जडेजाच्या फिरकीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. न्यूझीलंडकडून रॉस टेलरने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. तर, मार्टिन गुप्टिल (२९) आणि कर्णधार केन विल्यम्सन (२७) यांनी कडवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
आश्विनने दुसऱ्या डावात विल्यम्सन, टेलर, ल्यूक राँकी (१५), मिशेल सँटनर (१४), जीतन पटेल (०), मॅट हेन्री (०) आणि टे्रंट बोल्ट (४)
यांना बाद करून किवींच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याच वेळी आश्विनने किवी कर्णधार विल्यम्सनला चौथ्यांदा या मालिकेत आपली शिकार केले. तसेच,
रवींद्र जडेजाने सलामीवीर गुप्टिल आणि जेम्स नीशम (०) यांना बाद केले. उमेश यादवने एक महत्त्वपूर्ण बळी घेताना टॉम लॅथमला (६) माघारी धाडले. (वृत्तसंस्था)

धावफलक-
भारत (पहिला डाव) : १६९ षटकांत ५ बाद ५५७ धावा (घोषित).
न्यूझीलंड (पहिला डाव) : ९०.२ षटकांत सर्व बाद २९९ धावा.
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय धावबाद (गुप्टिल/वॉटलिंग) १९, गौतम गंभीर झे. गुप्टिल गो. पटेल ५०, चेतेश्वर पुजारा नाबाद १०१, विराट कोहली पायचीत गो. पटेल १७, अजिंक्य रहाणे नाबाद २३. अवांतर : ६. एकूण : ४९ षटकांत ३ बाद २१६ धावा. गोलंदाजी : टे्रंट बोल्ट ७-०-३५-०; जीतन पटेल १४-०-५६-२; मिशेल सँटनर १७-१-७१-०; मॅट हेन्री ७-१-२२-०; जेम्स नीशम ४-०-२७-०.
न्यूझीलंड (दुसरा डाव) : टॉम लॅथम पायचीत गो. यादव ६, मार्टिन गुप्टिल पायचीत गो. जडेजा २९, विल्यम्सन पायचीत गो. आश्विन २७, रॉस टेलर त्रि. गो. आश्विन, ल्यूक राँकी त्रि. गो. आश्विन १५, नीशम झे. कोहली गो. जडेजा ०, बीजे बॉटलिंग नाबाद २३, मिशेल सँटनर त्रि. गो. आश्विन १४, जीतन त्रि. गो. आश्विन १४, हेन्री झे. शमी गो. आश्विन ०, टे्रंट बोल्ट झे. व गो. आश्विन ४. अवांतर : ३. एकूण : ४४.५ षटकांत सर्व बाद १५३ धावा. गोलंदाजी : शमी ७-०-३४-०; यादव ८-४-१३-१; आश्विन १३-५-२-५९-७; जडेजा १६-३-४५-२.

Web Title: Victory Seamolglaghna's hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.