विजयी कर्णधाराची उचलबांगडी हा चुकीचा पायंडा!
By admin | Published: January 13, 2017 01:24 AM2017-01-13T01:24:55+5:302017-01-13T01:24:55+5:30
भारतीय डेव्हिस चषक टेनिस संघाच्या कर्णधार पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आलेले आनंद
नवी दिल्ली : भारतीय डेव्हिस चषक टेनिस संघाच्या कर्णधार पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आलेले आनंद अमृतराज हे १९८७-८८ पासून तीन दशके सर्वोत्कृष्ट कर्णधार राहिले. त्यांच्यापेक्षा सरस कर्णधार मी तरी पाहिलेला नाही, असे मत व्यक्त करीत दिग्गज टेनिसपटू विजय अमृतराज यांनी विजयी कर्णधाराची उचलबांगडी हा चुकीचा पायंडा असल्याची टीका केली आहे. आनंद हे विजय यांचे लहान बंधू आहेत.
डेव्हिस चषकात स्वत: भारताचे कर्णधार राहिलेले विजय म्हणाले, ‘आनंद समर्पित व्यक्ती होते. त्यांनी देशाला जे निकाल दिले त्यावर कुणी शंका घेऊ शकत नाही.’ दोनदा विम्बल्डन आणि दोनदा अमेरिकन ओपनची उपांत्यपूर्व फेरीत धडक देणारे विजय म्हणाले, ‘मी प्रत्येक विषयात ढवळाढवळ करीत नाही. पण १९८७-८८ पासून आनंदपेक्षा सरस कुणी कर्णधार झाला नाही, इतके सांगू शकतो. तो माझा भाऊ आहे म्हणून नव्हे तर त्याचे कर्तृत्व पाहून हे वक्तव्य करीत आहे. अन्य खेळाडू त्यांच्या क्षमतेचा नाही. २० वर्षे अव्वल स्तरावर डेव्हिस चषक खेळला. काही दिग्गजांना पराभूत केले. टेनिसप्रति तो झपाटला असून फ्युचर्स, चॅलेंजर्स आणि एटीपीसारख्या २५० स्पर्धांवर तो ध्यान देत आहे.’ (वृत्तसंस्था)
खराब कामगिरीमुळे नव्हे तर संघात शिस्त कायम राखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून आनंदला एआयटीएने निलंबित केले, याकडे लक्ष वेधले असता विजय अमृतराज पुढे म्हणाले, ‘मला अन्य मुद्दे माहिती नाहीत. मी वृत्तपत्रात वाचले. माझ्या मते, आनंद सर्वोत्कृष्ट कर्णधार होता.’आनंद हा पुण्यात होणाऱ्या भारत-न्यूझीलंड लढतीत देशाचे अखेरचे नेतृत्व करणार आहे. एप्रिलपासून संघाची धुरा महेश भूपतीकडे जाणार आहे. महेश भूपती हा नेतृत्व करण्याइतपत पात्र आहे यात शंका नाही. पण आनंदने पहिल्या १०० जणांमध्ये खेळाडूंचा समावेश नसतानादेखील निकाल दिले आहेत. विजयी कर्णधाराला सहसा अशाप्रकारे काढण्याची परंपरा योग्य नाही. सद्यस्थितीत प्ले आॅफमध्ये स्थान मिळविणे सोपे नाही. निकाल चांगले येत नसतील तर बदल केला, हे मी समजू शकतो. पण निकाल चांगले येत असताना असा तुघलकी बदल आश्चर्यचकित करणारा आहे.
-विजय अमृतराज