VIDEO - ख्रिस गेलने विराटचे केले "हटके" स्वागत
By admin | Published: April 4, 2017 12:27 PM2017-04-04T12:27:07+5:302017-04-04T12:27:07+5:30
धमाकेदार फलंदाज ख्रिस गेलने मैदानावर आणि मैदानाबाहेर नेहमीच आपला वेस्ट इंडियन क्रिकेटशैलीतला मोकळेपणा, बिनधास्तपणा जपला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 4 - धमाकेदार फलंदाज ख्रिस गेलने मैदानावर आणि मैदानाबाहेर नेहमीच आपला वेस्ट इंडियन क्रिकेटशैलीतला मोकळेपणा, बिनधास्तपणा जपला आहे. सामना जिंकल्यानंतर भर मैदानात किंवा एखाद्या पार्टीमध्ये बिनधास्त नृत्य करणा-या गेलला आपण अनेकदा पाहिले आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे प्रतिनिधीत्व करणा-या गेलने संघसहकारी विराट कोहलीचे सुद्धा अशाच स्टायलिश पद्धतीने स्वागत केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनोख्या पद्धतीने स्वागत करणा-या गेलचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. विराट आरसीबीच्या संघात दाखल झाला असला तरी, सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये प्रेक्षकांना "विराट" फटकेबाजीला मुकावे लागेल असे दिसते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिस-या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती.
अजूनही तो या दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे सुरुवातीचे काही सामने त्याला ड्रेसिंगरुममध्ये बसून पहावे लागू शकतात. विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन कर्णधारपदाची जबाबदारी संभाळेल. दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्सही पाठिच्या दुखापतीने त्रस्त असल्याने वॉटसनही कर्णधारपदाची जबाबदारी संभाळणार आहे.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या 9 मोसमात आरसीबीला एकदाही जेतेपद मिळवता आलेले नाही. पण नेहमीच त्यांनी प्रतिस्पर्धी संघासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध बंगळुरुचा पहिला सामना होणार आहे.