VIDEO: ...म्हणून स्टिव्ह स्मिथवर भडकला विराट कोहली
By admin | Published: March 7, 2017 05:06 PM2017-03-07T17:06:30+5:302017-03-08T12:30:19+5:30
बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह सर्वच खेळाडू चांगलेच भडकले
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - बंगळुरू कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करून भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंकडून एकमेकांवर जोरदार शेरेबाजी पाहायला मिळाली. रंगतदार झालेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह सर्वच खेळाडू चांगलेच भडकले होते. स्मिथने जे काही केलं त्यावर मैदानाबाहेरूनही चांगलीच टीका होत आहे.
दुस-या डावात भारताच्या 188 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या कांगारू संघाची 68 वर तीन बाद अशी अवस्था होती. भारतासाठी 21वं षटक जलदगती गोलंदाज उमेश यादवने टाकलं. या षटकातील तिस-या चेंडूवर स्मिथ पायचित झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी अनियमितपणे उसळी घेणा-या या खेळपट्टीवर बराच खाली राहिलेला तो चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा होता. त्यामुळे पंचांनीही क्षणाचाही वेळ न घेता त्याला बाद ठरवलं. चेंडू स्मिथच्या पायाला लागताच भारतीय खेळाडुंनीही जल्लोष करायला सुरूवात केली. मात्र, त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे तिस-या पंचांकडे दाद मागण्याच्या (डीआरएस) दोन्ही संधी उपलब्ध होत्या. आपण आऊट आहोत की नाही याबाबत स्मिथला शंका होती. त्यामुळे रिव्ह्यू घ्यावा की नाही हे विचारण्यासाठी स्मिथ नॉनस्ट्राइकला असलेल्या पिटर हॅन्डसकॉम्बकडे गेला. पण तेथून तो ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बसलेल्या ड्रेसिंग रूमकडे पाहात होता, आणि तेथून त्याला कांगारूंचे खेळाडू इशारे करत होते. पंचांच्याही हे ध्यानात आलं ते स्मिथकडे पोहोचले आणि तू असं करू शकत नाही असं ते त्याला म्हणाले. दरम्यान भारतीय संघातील खेळाडू चांगलेच भडकले. जर स्मिथने रिव्ह्यू घेतला असता तर ऑस्ट्रेलियाचा एक रिव्ह्यूही वाया गेला असता. भारतीय खेळाडूंनी त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. खेळाडूंचा वाढता आक्रोश पाहून पंचांनी मध्यस्थी केली आणि स्मिथला जायला सांगितलं.
स्मिथ तंबूत परतत असताना विराटसह भारताच्या काही खेळाडूंनी त्याच्यावर शेरेबाजी केली. मात्र स्मिथच्या या वागण्यावर क्रिकेटच्या मैदानावरूनच नव्हे तर मैदानाबाहेरूनही जोरदार टीका होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही स्मिथची खिल्ली उडवत ड्रेसिंग रूम रिव्ह्यू सिस्टिम असं ट्विट करून स्मिथला लक्ष्य केलं आहे.
DRS - Dressing room review system? Smith tries to get some suggestions from the dressing room for a review https://t.co/2V488WaKEp#INDvAUS
— BCCI (@BCCI) March 7, 2017