VIDEO: विराटच अव्वल, संघासाठी ड्रिंक्स घेऊन मैदानात धाव
By admin | Published: March 25, 2017 12:54 PM2017-03-25T12:54:00+5:302017-03-25T13:06:25+5:30
ऑस्ट्रिलेयाविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात जेव्हा ड्रिंक्स ब्रेक पुकारण्यात आला तेव्हा स्टेडिअमवर उपस्थित असलेल्या सर्वांचं लक्ष भारतीय संघासाठी ड्रिंक्स घेऊन धावणा-या विराट कोहलीकडे होतं
Next
ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 25 - ऑस्ट्रिलेयाविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात जेव्हा ड्रिंक्स ब्रेक पुकारण्यात आला तेव्हा हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर उपस्थित असलेल्या सर्वांचं लक्ष भारतीय संघासाठी ड्रिंक्स घेऊन धावणा-या खेळाडूकडे होतं. कारण तो दुसरा कोणी नाही तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली होता. आपली ही नवीन भूमिका विराट कोहलीला आवडली असून त्याचा फायदा तो संघासाठी करत आहे.
खांद्याला दुखापत झाल्याने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने यावरुन पुन्हा एकदा आपणच अव्वल असल्याचं सिद्ध केलं आहे. आपण खेळत नसलो तरी संघाला वेळोवेळी लागणारे सल्ले तसंच आपलं योगदान देण्यामध्ये विराट अजिबात मागे नाही. यासाठीच जेव्हा ड्रिंक्स ब्रेक झाला तेव्हा संघासाठी ड्रिंक्स घेऊन विराट कोहलीने मैदानात धाव घेतली. ड्रिंक्स ब्रेकचा फायदा घेत विराट कोहलीने अजिंक्य रहाणेला काही महत्वाचे सल्लेही दिले. यावरुन विराट कोहलीची खेळभावना दिसत असून एक कर्णधार म्हणून तो किती योग्य आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
इतकंच नाही तर त्याच्या जागी स्थान मिळालेल्या कुलदीप यादवने जेव्हा डेव्हिड वॉर्नरची विकेट घेत आपल्या टेस्ट करिअरमधली पहिली विकेट मिळवली. तेव्हा सीमारेषेवर उभ्या असलेल्या कुलदीप यादवसाठी विराट ड्रिंक्स घेऊन गेला आणि महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.
मालिकेचा निकाल ठरवणा-या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लवकर बसला पण त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ (79) आणि सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (56) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी दुस-या विकेटसाठी134 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने आपल्या तीन विकेट्स गमावल्या आहेत.
चार सामन्यांच्या मालिकेचा निकाल ठरविणा-या निर्णायक कसोटी सामन्याआधीच विराट कोहली खेळणार नसल्याने भारताला खूप मोठा धक्का बसला. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला आराम देण्यात आला आहे. विराट कोहली खेळणार नसल्याने उप कर्णधार अजिंक्य रहाणेकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान विराट कोहलीऐवजी भारतीय संघात गोलंदाज कुलदीप यादवला संधी देण्यात आली. या सामन्यातून कुलदीप यादवने पदार्पण केलं आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.