विजय क्लब, गोल्फादेवी यांची उपांत्य फेरीत धडक

By admin | Published: May 6, 2017 03:05 AM2017-05-06T03:05:27+5:302017-05-06T03:05:27+5:30

विजय क्लब आणि गोल्फादेवी या नावाजलेल्या संघांनी आपआपल्या सामन्यात अपेक्षित बाजी मारताना कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या

Vijay Club, Golpe Devi face the semifinals | विजय क्लब, गोल्फादेवी यांची उपांत्य फेरीत धडक

विजय क्लब, गोल्फादेवी यांची उपांत्य फेरीत धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विजय क्लब आणि गोल्फादेवी या नावाजलेल्या संघांनी आपआपल्या सामन्यात अपेक्षित बाजी मारताना कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी, विकास व एस. एस. जी. या संघांनीही चमकदार कामगिरीसह उपांत्य फेरीत आगेकूच केली.
वरळी स्पोटर््स क्लबच्या वतीने आदर्शनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत विजय क्लबने मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना ज्ञानदीपचे आव्हान ३२-२१ असे संपुष्टात आणले. पहिल्या सत्रात आक्रमक खेळ करत विजय संघाने १५-८ अशी दमदार आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर विजय संघाने घेतलेल्या सावध भूमिकेचा फायदा घेत ज्ञानदीपने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, राजू नाटेकर, अभिषेक रूपकर व अभिषेक रामाणे यांनी जबरदस्त आक्रमण व बचावाचा खेळ करताना ज्ञानदीपला नमवले. पराभूत संघाकडून राहुल शिरोडकर, ओम्कार येणापुरे यांनी चमक दाखवली.
दुसरीकडे, एकतर्फी झालेल्या सामन्यात बलाढ्य गोल्फादेवी संघाने सिद्धिप्रभा संघाचा ५४-१९ असा धुव्वा उडवला. शार्दुल हरचकर, धनंजय सरोज यांच्या आक्रमक चढाया आणि कल्पेश म्हात्रेच्या मजबूत पकडी या जोरावर गोल्फादेवीने मध्यांतरालाच ३४-८ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर हीच आघाडी आणखी मजबूत करत गोल्फादेवीने बाजी मारली.
अन्य सामन्यात आकाश मयेकर, राज सिंग यांच्या जोरावर विकास संघाने दिलखुश संघाला ४०-१४ असे लोळवले. मध्यांतरालाच १७-७ अशी आघाडी घेतल्यानंतर विकास संघाने दिलखुशला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. एसएसजी संघानेही शानदार विजय मिळवताना श्री साईनाथ ट्रस्टचा ३०-२४ असा पाडाव केला. पंकज मोहिते, सरोज चाचे यांचा अष्टपैलू खेळ एसएसजीच्या विजयात निर्णायक ठरला.

Web Title: Vijay Club, Golpe Devi face the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.