विजय क्लबने पटकावले शानदार विजेतेपद
By Admin | Published: December 28, 2014 01:52 AM2014-12-28T01:52:27+5:302014-12-28T01:52:27+5:30
अंतिम सामन्यात ना.म. जोशी मार्गच्या बंड्या मारुती संघाचे तगडे आव्हान १८-१६ असे परतावून लावत प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले.
मुंबई : दादरच्या बलाढ्य विजय क्लबने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात ना.म. जोशी मार्गच्या बंड्या मारुती संघाचे तगडे आव्हान १८-१६ असे परतावून लावत प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले.
प्रभादेवी येथील यंग भारत सेवा मंडळाच्या वतीने राजाभाऊ साळवी क्रीडानगरीत नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी उच्च दर्जाचा खेळ करताना प्रेक्षकांना खूश केले. विजय क्लबचा हुकमी आक्रमक विजय दिवेकरची सुरुवातीलाच यशस्वी पकड करताना धमाकेदार सुरुवात केली. विनोद आयाळकरनेदेखील आक्रमक व खोलवर चढाई करताना बंड्या मारुती संघाला ४-० असे आघाडीवर नेले. यानंतर मात्र या धक्क्यातून सावरताना विजय क्लबने आपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली.
कमलेश नांदोस्करने आक्रमक चढाई करताना अप्रतिमरीत्या एकाचवेळी सागर पाटील व विनोद आयाळकरला टिपताना विजय क्लबच्या संघात जोश आणला. यानंतर अजिंक्य कापरेने मिळालेल्या जीवदानाचा अचूक फायदा उचलताना एकाच चढाईमध्ये ४ गडी टिपताना विजय क्लबला आघाडीवर नेले. तर १३व्या मिनिटाला फॉर्ममध्ये आलेल्या विजय क्लबने प्रतिस्पर्धी बंड्या मारुतीवर लोण चढवताना १९-६ अशी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले.
मध्यांतरानंतर पिछाडीवर पडलेल्या बंड्या मारुती संघाच्या विनोद आयाळकर, जितेश सापते यांनी झुंजार खेळ करताना संघाचे पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजिंक्य कापरे, कमलेश नांदोरकर आणि विजय दिवेकर यांच्या मजबूत चढाई-पकडीच्या जोरावर विजय क्लबने अखेरच्या क्षणी अवघ्या २ गुणांनी बंड्या मारुतीला नमवले.
(क्रीडा प्रतिनिधी)