डिंकोच्या उपचारांसाठी मुष्टियोद्धे सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:32 AM2020-04-23T00:32:19+5:302020-04-23T00:32:39+5:30
जमवली एक लाखाहून अधिक रक्कम
नवी दिल्ली : भारताचा आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मुष्टियोद्धा डिंको सिंग सध्या यकृताच्या कर्करोगाशी सामना करत आहे. यासाठी डिंकोच्या उपचारांसाठी भारताचा स्टार मुष्टियोद्धा विजेंदर सिंग आणि मनोज कुमार आवश्यक आर्थिक मदत जमविण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोघांव्यतिरिक्त काही अन्य मुष्टियोद्ध्यांनी आणि प्रशिक्षकांनी एक व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला असून, त्याद्वारे सर्व जण मिळून एक लाख रुपयाची मदत थेट डिंकोच्या बँक खात्यात जमा करणार आहेत.
याबाबत विजेंदरने सांगितले की,‘आमचा एक ‘हम में है दम’ या नावाचा व्हॉटस्अॅप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये मनोजने डिंकोच्या आजाराची माहिती दिली होती. यानंतर आम्ही डिंकोच्या बँक खात्याची माहिती घेतली आणि सर्व मिळून पैसे जमवत आहोत.’
मंगळवारी या मदतकार्याला सुरुवात झाल्याची माहितीही मिळाली. यामध्ये सर्व सदस्यांनी एक हजारापासून २५ हजार रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली आहे. विजेंदरने पुढे सांगितले की,‘आम्ही एक लाखाहून अधिक रकमेची मदत जमा केली आहे आणि ही सर्व रक्कम थेट डिंकोच्या बँक खात्यात जमा होईल. मी २५ हजार रुपयाची मदत दिली असून, काहींनी ११ हजार तर काहींनी ५ हजार रुपयाची मदत केली आहे.’ त्याचप्रमाणे ‘डिंको आमचा हीरो आहे. (वृत्तसंस्था)
संकटकाळी एक-दुसऱ्याची मदत करावी, हे प्रत्येक मुष्टियोद्ध्याचे कर्तव्य आहे,’ असेही विजेंदरने यावेळी म्हटले. मनोज कुमारने सांगितले की,‘हे आमचे कर्तव्य आहे. मदत मोठी असो की छोटी, रक्कम महत्त्वाची ठरत नाही. आम्हाला त्याच्यासोबत उभे राहायचे आहे.’