वर्षाअखेर रिंगमध्ये परतण्याची विजेंदर सिंगला आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 04:52 AM2020-04-07T04:52:46+5:302020-04-07T04:52:51+5:30
विजेंदर सध्या सर्किटमध्ये अपराजित आहे. त्याने आपल्या सर्व १२ लढती जिंकल्या आहेत.
नवी दिल्ली : भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंगला कोविड-१९मुळे आपल्या सर्व योजना रद्द कराव्या लागल्या, पण त्याला वर्षाच्या अखेरच्या सहा महिन्यांत रिंगमध्ये परतण्याची व आपली व्यावसायिक कारकीर्द पुन्हा सुरू करण्याची आशा आहे.
विजेंदर सध्या सर्किटमध्ये अपराजित आहे. त्याने आपल्या सर्व १२ लढती जिंकल्या आहेत. त्याचा अमेरिकेच्या बाब आरुमच्या टॉप रँक प्रमोशनसह करार आहे.
अमेरिकेला सुद्धा कोरोना व्हायरस महामारीची झळ बसली आहे. तेथे जवळजवळ १० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
बॉक्सिंगमध्ये भारताचा पहिला आॅलिम्पिक पदकविजेता ३४ वर्षीय विजेंदर म्हणाला, ‘मला मे महिन्यात लढत खेळायची होती, पण सध्याची स्थिती बघता ही लढत रद्द करण्यात आली. परिस्थिती सुधारेल आणि वर्षाच्या शेवटी लढत खेळण्याची संधी मिळेल, अशी मला आशा आहे.’
तो पुढे म्हणाला,‘निश्चित माझे नुकसान झाले आहे, पण काही करता येणार नाही. अशा स्थितीत शांत राहणे व परिस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा करणे योग्य आहे.’
विजेंदर म्हणाला,‘दिल्लीमध्ये माझ्या घरी सर्वकाही असून मी सराव करीत आहे. मला बाहेर जाण्याची गरज नाही. मी स्वत:च सराव करतो, मला तशी सवय आहे. ज्यावेळी मी इंग्लंडमध्ये असतो त्यावेळीच ट्रेनरची साथ मिळते.’
विजेंदरचे ट्रेनर मॅन्चेस्टरचे ली बियर्ड आहेत. ते लढतीच्या काही दिवसांपूर्वी विजेंदरसोबत जुळणार होते.
विजेंदर म्हणाला, ‘ज्यावेळी लढत खेळली जाईल त्यासाठी तयारी असणे आवश्यक आहे. मी घरीच तयारी करीत आहे. कारण तुम्ही कुठल्याही प्रकारे घराबाहेर पडू शकत नाही आणि ते योग्यही नाही.’ (वृत्तसंस्था)