तो माझा दिवस नव्हता, लवकरच शानदार पुनरागमन करीन - विजेंदर सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 05:39 PM2021-03-20T17:39:43+5:302021-03-20T17:40:35+5:30
ज्याला ‘बच्चा’ म्हणून संबोधले होते तो रशियाचा अर्तीयश लोपसन हा विजेंदरासाठी महागडा ठरला.
- सचिन कोरडे
देशात पहिल्यांदाच एका तरंगत्या जहाजावर उभारण्यात आलेल्या रिंगमध्ये बाॅक्सिंगची लढत रंगली. व्यावसायिक लढतींमध्ये अपराजित असलेला भारतीय स्टार विजेंदर या रिंगमध्ये उतरणार असल्याने चाहत्यांना या स्पर्धेची अधिकच उत्सुकता लागली होती. जवळपास एक वर्षांच्या कालावधीनंतर विजेंदरचा ‘पंच’ पाहायला मिळणार होता. समोर रशियाचा युवा खेळाडू असल्याने निकाल काय लागेल, याची उत्सुकताही होतीच. मात्र निकालाने सर्वांनाच धक्का दिला.
गोव्यात शुक्रवारी मध्यरात्री विजेंदरच्या पराभवाची बातमी चाहत्यांना धक्का देउन गेली. कारण ज्याला ‘बच्चा’ म्हणून संबोधले होते तो रशियाचा अर्तीयश लोपसन हा विजेंदरासाठी महागडा ठरला. विजेंदरची व्यावसायिक लढतींमधील विजयांची मालिका अर्तीयश याने राेखली. हा पराभव विजेंदरच्या जिव्हारी लागला असेलच. कारण प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची घोडचूक त्याला कळून चुकली. रशियाच्या उंचपुरा अर्तीयश हा अवघ्या २६ वर्षांचा जरी असला तरी त्याच्यातील चपळता आणि क्षमता ही विजेंदरपेक्षाही वरचढ ठरली. विजेंदरचा प्रत्येक डाव त्याने हाणून पाडला.
It’s happened some time 👊🏽
— Vijender Singh (@boxervijender) March 19, 2021
या पराभवानंतर भारतीय स्टार खेळाडू म्हणाला की, विजय आणि पराभव हा खेळाचा भाग आहे. तो माझा दिवस नव्हता. कष्ट करण्यावर मी नेहमीच विश्वास ठेवतो. मला खात्री आहे की मी लवकरच शानदार पुनरागमन करुन चाहत्यांना आनंद देईन.
दरम्यान, रशियाचा लोपसान हा उंचीने सहा फूट चार इंच उंच असून, व्यावसायिक रिंगणात त्याने सहापैकी चार लढती जिंकल्या आहेत. त्यात तो दोनदा नॉकआऊट जिंकला आहे.