‘बच्चा’विरुद्ध विजेंदर सिंगचा झाला पराभव; अतिआत्मविश्वास नडला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 10:56 AM2021-03-20T10:56:06+5:302021-03-20T11:08:15+5:30
विजेंदर सिंगला अतिआत्मविश्वास नडला
पणजी : व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सलग १२ लढती जिंकून आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याला अखेर पहिल्या पराभवास सामोरे जावे लागले. रशियाच्या उंचपुऱ्या अर्तीयश लोपसनविरुद्ध खेळताना विजेंदरचा निभाव लागला नाही. तो तांत्रिक नॉकआऊटच्या आधारे पराभूत झाला.
गोव्यातील एका कॅसिनो जहाच्या छतावर झालेल्या या ‘बॅटल ऑन शिप’ लढतीत विजेंदरला पाचव्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. २००८ साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या विजेंदरला विजयाचा पूर्ण विश्वास होता, मात्र त्याने प्रतिस्पर्धी लोपसनला कमी लेखण्याची चूक केली. या लढतीआधी विजेंदरने लोपसनला ‘बच्चा’ म्हटले होते. सहा फूट चार इंच उंचीच्या लोपसनने सुरुवातीपासून वर्चस्व राखताना विजेंदरचा भक्कम बचाव भेदण्यात यश मिळवले.
पहिल्या फेरीत दोन्ही बॉक्सर्सनी सावध सुरुवात केली, मात्र लोपसनने विजेंदरच्या चालींचा पूर्ण अंदाज घेतला. त्याने आपल्या उंचीचा पूर्ण फायदा घेताना विजेंदरला प्रत्येक पंचसाठी झुंजवले. दुसºया फेरीत विजेंदर चांगल्या स्थितीत दिसला. त्याने लोपसनविरुद्ध काही चांगले ठोसे लगावले. मात्र, लोपसनने बचावाचे भक्कम तंत्र सादर करताना विजेंदरला फारसे यश मिळू दिले नाही.
तिसऱ्या फेरीत तुल्यबळ लढत पाहण्यास मिळाली. परंतु, चौथ्या फेरीत लोपसन वरचढ ठरला. त्याने विजेंदरवर जोरदार प्रहार करताना त्याला निष्प्रभ केले. या फेरीत विजेंदरवर एकतर्फी वर्चस्व राखत लोपसनने सामन्याचा निकाल जवळपास निश्चित केला होता. पाचव्या फेरीतही लोपसनचा धडाका कायम राहिला आणि रेफ्रींनी यावेळी तोल गमावणाºया विजेंदरला अनफिट घोषित केले आणि लोपसनचा विजय निश्चित झाला.
२०१५ साली व्यावसायिक बॉक्सिंगला सुरुवात केल्यापासून विजेंदरचा हा पहिलाच पराभव ठरला. पदार्पण केल्यापासून सलग १२ लढती जिंकण्याचा पराक्रम केल्यानंतर विजेंदरची घोडदौड गोव्यामध्ये थांबली.