विजेंदर सिंगचा निवृत्तीचा पंच?
By admin | Published: June 29, 2015 01:19 AM2015-06-29T01:19:20+5:302015-06-29T01:19:20+5:30
भारताचा बॉक्सिंगचा आयडॉल...आॅलिम्पिक पदकविजेता विजेंदर सिंग सध्या भारताकडून बॉक्सिंग खेळणे सोडण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत.
नवी दिल्ली : भारताचा बॉक्सिंगचा आयडॉल...आॅलिम्पिक पदकविजेता विजेंदर सिंग सध्या भारताकडून बॉक्सिंग खेळणे सोडण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत. व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये बक्कळ पैसा कमाविण्यासाठी विजेंदरने देशाकडून खेळणे सोडण्याची तयारी केली आहे.
भारतीय बॉक्सिंगला अलविदा केल्यानंतर विजेंदर ब्रिटनमधील प्रमोटर फ्रान्सिस वॉरेन यांच्या व्यावसायिक लीगमध्ये खेळणार असल्याचे समजते. विजेंदरने इंग्लंडमध्ये व्यावसायिक बॉक्सिंग खेळणाऱ्या खेळाडूंसोबत स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आपल्या निर्णयाबाबत विजेंदरने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. मात्र वॉरेन यांचे माध्यम व्यवस्थापक रिचर्ड मेनार्ड यांनी तो व्यावसायिक स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याने जर आपला निर्णय प्रत्यक्षात उतरविल्यास हा भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी मोठा धक्का ठरू शकतो.(वृत्तसंस्था)
----------
विजेंदर मेवेदरच्या वाटेवर
प्रो बॉक्सिंगमध्ये हौशी बॉक्सर्सला अपेक्षेपेक्षा अधिक कमाई मिळते. फ्लॉयड मेवेदर व पॅकियाओ यांच्यात झालेल्या महामुकाबल्यात हजारो कोटी रुपयांची बक्षीसे मिळाली होती. त्यामुळे विजेंदरलाही या व्यावसायिक बॉक्सिंगची भूरळ पडली. निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता व कारकिर्द पुढे चालू ठेवण्यासाठी विजेंदर पर्याय शोधत असेल. तो पाच-सहा वर्षे फिट राहिल्यास व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये भरपूर पैसे कमावू शकतो, अशी माहिती बॉक्सिंग इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
----------
...तर आॅलिम्पिक
तयारीला बसेल हादरा
विजेंदरने व्यावसायिक बॉक्सिंगची निवड केल्यास त्याला देशाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट आॅलिम्पिक पोडियममध्ये विजेंदरचा सहभाग आहे. यानुसार १३ जुलैपासून सराव शिबिराला प्रारंभ होणार आहे. विजेंदरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (३ पदके), आशियाई क्रीडा स्पर्धा (२ पदके) आणि जागतिक चॅम्पियनशिप व आॅलिम्पिकमध्येही १-१ पदक जिंकलेले आहे. त्याने निवृत्ती घेतल्यास भारतीय क्रीडा विश्वासाठी तो एक मोठा धक्का असेल.
------------
वॉरेन यांचे माध्यम व्यवस्थापक रिचर्ड मेनार्ड यांनी दिलेल्या संकेतानुसार विजेंदर सिंग उद्या (दि. २९ जून) व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धतील सहभागाबाबत घोषणा करु शकतो. तो सध्या प्रशिक्षणासाठी इंग्लंडमध्येच आहे. असे घडल्यास व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सहभागी होणारा तो दुसरा भारतीय बॉक्सर ठरेल. याआधी २००० मधील सिडनी आॅलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहिलेला गुरूचरण सिंग व्यावसायिक बॉक्सर झाला होता. आगामी लीगमध्ये सहभागी होण्यासाठी आपण स्वखचार्ने प्रशिक्षणासाठी इंग्लंडला जात असल्याचे विजेंदरने सांगितले होते. तेथून परतल्यानंतर १३ जुलैला तो राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार होता. विजेंदरने इंग्लंडमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्याने व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धेॅत सहभागी होण्याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.
- गुरुबक्ष सिंह संधू, राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक