विजेंदर सिंगचे यशस्वी ‘यूएस’ पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:18 AM2019-07-15T04:18:51+5:302019-07-15T04:18:58+5:30
अमेरिकन व्यावसायिक सर्किटमध्ये यशस्वी पदार्पण करताना आपल्या तुलनेत अधिक अनुभवी असलेल्या माईक स्नायडरवर तांत्रिक नॉकआऊटद्वारे विजय मिळवला.
नेवार्क : भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगने येथे अमेरिकन व्यावसायिक सर्किटमध्ये यशस्वी पदार्पण करताना आपल्या तुलनेत अधिक अनुभवी असलेल्या माईक स्नायडरवर तांत्रिक नॉकआऊटद्वारे विजय मिळवला. शनिवारी रात्री (भारतात रविवारी पहाटेपर्यंत) खेळल्या गेलेल्या ८ फेऱ्यांच्या सुपर मिडलवेट बाऊटमध्ये हरियाणाच्या ३३ वर्षीय बॉक्सरने चार राऊंडमध्ये वर्चस्व गाजवले. यासह व्यावसायिक सर्किटमध्ये त्याने सलग अकरावा विजय मिळवला.
बाऊटनंतर विजेंदर म्हणाला, ‘प्रदीर्घ कालावधीनंतर रिंगमध्ये परतणे शानदार होते. अमेरिकेत विजय मिळविणे आनंददायी असून ही लढत रंगतदार होती. अमेरिकेत पदार्पणात विजय मिळविल्यामुळे खूश आहे.’ चौथ्या फेरीच्या दुसºया मिनिटाला विजयने बाजी मारली. त्यावेळी विजेंदरने स्नायडरला सलग पंच लगावत पराभूत केले. त्यामुळे रेफरीला निकाल भारतीय बॉक्सर्सच्या बाजूने द्यावा लागला.
विजेंदर म्हणाला, ‘मला वर्चस्व गाजवण्यसाठी चार फेºया लागल्या. मी दोन-तीन फेऱ्यांची अपेक्षा केली होती, पण मला चार फेºयापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.’ विजेंदरचा हा आठवा नॉकआऊट विजय आहे. ३८ वर्षीय स्नायडरच्या पंचमध्ये अधिक जोर दिसला नाही, तर विजेंदरचे पंच अचूक व दमदार होते.