विजेंदर चीनच्या जुल्फिकार मैमेतअली विरुध्द भिडणार
By admin | Published: June 28, 2017 12:41 AM2017-06-28T00:41:37+5:302017-06-28T00:41:37+5:30
भारताचा स्टार बॉक्सर आणि आॅलिम्पिक कांस्य पदक विजेता विजेंदर सिंग आगामी ५ आॅगस्टला दुहेरी विजेतेपदांच्या लढतीत चीनी बॉक्सर जुल्फिकार मैमेतअली याच्याविरुद्ध भिडेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारताचा स्टार बॉक्सर आणि आॅलिम्पिक कांस्य पदक विजेता विजेंदर सिंग आगामी ५ आॅगस्टला दुहेरी विजेतेपदांच्या लढतीत चीनी बॉक्सर जुल्फिकार मैमेतअली याच्याविरुद्ध भिडेल.
विजेंदर डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक मिडलवेट चॅम्पियन आहे, तर जुल्फिकर डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन आहे. विशेष म्हणजे ही रोमांचक लढत मुंबईतील वरळी येथील एनएससीआय इनडोर स्टेडियममध्ये होणार असून मंगळवारी या लढतीची घोषणा करण्यात आली.
विजेंदर सिंगच्या उपस्थितीमध्ये मुंबईत या लढतीची घोषणा झाली. या महत्त्वाच्या बाउटसाठी विजेंदर आपला टे्रनर ली बीयर्ड याच्यासह इंग्लंड येथील मँचेस्टर येथे सराव करीत आहे. विशेष म्हणजे, या लढतीचे पहिले तिकिट विजेंदरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला प्रदान केले.
या लढतीमध्ये दोन्ही बॉक्सर आपआपले डब्ल्यूबीओ विजेतेपद पणाला लावतील. ही लढत जिंकणार बॉक्सर आपल्यासह प्रतिस्पर्धी बॉक्सरचाही किताब पटकावेल. दरम्यान यावेळी, अखिल कुमार, जितेंदर कुमार आणि नीरज गोयत हे अन्य भारतीय स्टार बॉक्सरही आपआपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धीविरुद्ध लढतील. तसेच, प्रदीप खारेरा, धर्मेंद्र ग्रेवाल आणि कुलदीप धांडा हे देखील यावेळी आपले कौशल्य दाखवतील.