विकास कृष्णनची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By Admin | Published: May 2, 2017 01:23 AM2017-05-02T01:23:22+5:302017-05-02T01:23:22+5:30
भारताचा आघाडीचा बॉक्सर विकास कृष्णन (७५ किलो) आणि गौरव विधूडी (५६ किलो) यांनी आपआपल्या गटात चमकदार
ताश्कंद : भारताचा आघाडीचा बॉक्सर विकास कृष्णन (७५ किलो) आणि गौरव विधूडी (५६ किलो) यांनी आपआपल्या गटात चमकदार कामगिरी करताना सोमवारी आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तसेच, अमित फंगलनेही (४९ किलो) आपल्या गटातून आगेकूच केली.
अत्यंत एकतर्फी झालेल्या लढतीत विकासने आपला जलवा दाखवताना अवघ्या २ मिनिटांमध्ये थायलंडच्या पाथोमसाक कुटिया याला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. कुटिया याच्या डावा डोळ्याच्या वरच्या भागावर जखम झाल्याने दोन वेळा लढत थांबवावी लागली आणि शेवटी पंचांनी विकास कृष्णनला विजयी घोषित केले. विकासच्या जोरदार ठोश्यांपुढे कुटियाचा काहीच निभाव लागला नाही. आता स्पर्धेतील अव्वल आठ खेळाडूंच्या फेरीमध्ये विकासचा सामना इंडोनेशियाच्या बेताउबुन ब्रमाविरुध्द होईल.
दुसरीकडे, गौरवने थायलंडच्याच युतापोंग टोंगडीला लोळवले. पुढील फेरीत गौरवपुढे चीनचा द्वितीय मानांकीत जियावी हांग याचे तगडे आव्हान असेल. त्याचवेळी, आशियाई युवा स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या आशिष कुमारला (६४ किलो) उझबेकिस्तानच्या इकबोलजान खोलदारोवविरुध्द पराभव पत्करावा लागला. अमितने सहज आगेकूच करताना अफगाणिस्तानच्या रामिश रहिमला नमवले. (वृत्तसंस्था)