विनेशने मागितली माफी, पण तरीही खेळणे कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:13 AM2021-08-16T05:13:45+5:302021-08-16T05:14:13+5:30
ऑलिम्पिकमध्ये विनेशचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. स्पर्धेदरम्यान विनेशने आपल्याच संघ सहकाऱ्यांसोबत राहण्यास नकार दिला होता.
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेल्या बेशिस्त वर्तनामुळे भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) स्टार मल्ल विनेश फोगाट हिला निलंबित केले. यानंतर, विनेशने आता महासंघाची माफी मागितली आहे. मात्र, असे असले, तरी तिचे कुस्ती खेळणे कठीण असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ऑलिम्पिकमध्ये विनेशचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. स्पर्धेदरम्यान विनेशने आपल्याच संघ सहकाऱ्यांसोबत राहण्यास नकार दिला होता. सोनम, अंशू मलिक आणि सीमा बिस्ला यांच्याजवळ विनेशला तिची खोली उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, यावर आक्षेप घेत, विनेशने यामुळे कोरोना होण्याचा धोका असल्याचे सांगत, हंगामा केला
होता. हे सर्व खेळाडू भारतातून टोकियोमध्ये आल्याचा युक्तिवाद विनेशने केला होता.
याशिवाय विनेशने स्पर्धेदरम्यान भारतीय संघाच्या अधिकृत प्रायोजकाच्या जर्सीऐवजी वैयक्तिक प्रायोजकाचे नाव असलेली जर्सी परिधान केली होती. या सर्व गोंधळानंतर डब्ल्यूएफआयने विनेशला निलंबित केले.
यानंतर, विनेशने डब्ल्यूएफने पाठविलेल्या नोटीसला उत्तर दिले. या प्रकरणी एका सूत्राने माहिती दिली की, ‘विनेशने डब्ल्यूएफआयला उत्तर देताना या प्रकरणी माफी मागितली आहे. मात्र, यानंतरही तिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणे कठीण आहे.’ अनेक मल्लांना काही व्यावसायिक प्रायोजकांची मदत मिळत असून, डब्ल्यूएफआय या वैयक्तिक प्रायोजकांच्या काम करण्याच्या पद्धतीवर खूश नाही.