विनेश फोगाट रौप्य पदकाची मानकरी आहे की नाही? निकालाची वेळ ठरली!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 04:09 PM2024-08-10T16:09:03+5:302024-08-10T16:12:17+5:30
विनेश फोगाटसह भारताच्या बाजूनं निकाल लागणार का? ते पाहण्याजोगे असेल.
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने पॅरिस ऑलिम्पिकमधील अपात्रतेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील निकाल स्पर्धेची सांगता पूर्वी येईल हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून (Court of Arbitration for Sports) विनेश फोगाटसह भारताच्या बाजूनं निकाल लागणार का? ते पाहण्याजोगे असेल. हा निकाल सकारात्मक असेल, असा विश्वास भारतीय ऑलिम्पिक समितीनंही व्यक्त केला आहे. विनेश फोगाट हिने संबंधित याचिकेच्या माध्यमातून संयुक्त रौप्य पदक मिळावे, अशी विनंती केली आहे. जर निकाल तिच्या बाजूनं लागला तर भारताच्या खात्यात आणखी एका रौप्य पदकाची भर पडेल.
निकालाची वेळ ठरली!
विनेश फोगटच्या ऑलिम्पिक अपात्रतेविरुद्धच्या या खटल्यात ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर फोगटची आणि भारतीय ऑलिम्पिक समितीची बाजू मांडली. या प्रकरणातील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या समारोह कार्यक्रमाआधी शनिवारी पॅरिसमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता ( भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30) या खटल्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सुवर्णमयी इतिहासाचा क्षण अनुभवायला मिळेल, असे वाटत असताना बसला होता दणका
भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत 50 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली होती. असा पराक्रम करणारी ती भारताची महिली महिला कुस्तीपटूही ठरली. एका बाजूला ती सुवर्णमय इतिहास रचणार अशी चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला तिच्यासह भारताला मोठा धक्का बसला. अंतिम लढतीआधी नियमापेक्षा अधिक वजन असल्याच्या कारणावरून तिला अपात्र ठरवण्यात आले होते.
विनेश फोगाटची निवृत्ती अन् आखाड्याबाहेरचा न्यायासाठी खेळलेला डाव
याप्रकरणानंतर "कुस्ती जिंकली, पण मी हारले" असे म्हणत आखाडा कायमचा सोडण्याचा निर्णयही विनेश फोगाटने घेतला. पण जगातील मानाच्या स्पर्धेतील सन्मान मिळवण्यासाठी तिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (Court of Arbitration for Sport) दाद मागितली होती. जो कोणत्याही खेळाडूसाठी एक शेवटचा पर्याय आहे.
तिला न्याय मिळणार का?
विनेश फोगाटनं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे केलेल्या याचिकेनुसार, अपात्र घोषित झाल्यानंतर 50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातील रौप्य पदक संयुक्तरित्या मिळावे, अशी विनंती करण्यात आली आहे तिच्या याचिकेवर सकारात्मक विचार करत CAS नं यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. खेळाडूंची बाजू समजून घेतल्यानंतर लवादाकडून काय निकाल देण्यात येणार ते पाहण्याजोगे असेल.