विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? तिसऱ्यांदा निकाल लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:28 PM2024-08-13T23:28:15+5:302024-08-13T23:46:20+5:30

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर विनेश फोगटच्या खटल्याचा निर्णय अजून यायचा आहे. मात्र आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीय.

Vinesh Phogat Case Verdict Updates Now the court decision for silver will come on this day | विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? तिसऱ्यांदा निकाल लांबणीवर

विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? तिसऱ्यांदा निकाल लांबणीवर

Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला ऑलिम्पिक रौप्यपदक मिळेल की नाही? याबाबतचा निर्णय आज म्हणजेच 13 ऑगस्टच्या रात्री येणार होता. प्रत्येक भारतीय त्याची आतुरतेने वाट पाहत होता. मात्र आता याबाबत महत्त्वाची बातमी समोर आलीय. हे प्रकरण क्रीडा लवादाच्या न्यायालयात सुरू आहे. विनेश फोगटच्या रौप्यपदकाचा निकाल आता सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा निकाल १६ ऑगस्टला येणार आहे. 

भारताची कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या अंतिम फेरीतील सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आलं होतं. विनेशला १०० ग्रॅम जास्तीच्या वजनाने अपात्र ठरवल्यानंतर भारतीयांना मोठा धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त करत भारतीय ऑलिम्पिक महासंघाला शेवटपर्यंत पर्यंत्न करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर विनेश फोगटनं या प्रकरणी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये याचिका दाखल केली होती. मात्र या प्रकरणात क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडून पुन्हा एकदा निर्णय लांबणीवर टाकण्यात आलाय. आता विनेश फोगटच्या याचिकेवर निर्णय १६ ऑगस्टला येणार आहे. विनेश फोगटबाबतचा निर्णय पॅरिसच्या वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता आणि भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता दिला जाणार आहे. 

या प्रकरणातील एका निर्णयाचा सविस्तर आदेश यापूर्वीच जारी करण्यात आला आहे. सुवर्णपदकाचा सामना खेळण्याची परवानगी द्यावी, ही विनेशची पहिली मागणी होती. मात्र नियमांचा हवाला देत त्यांची मागणी तात्काळ फेटाळण्यात आली होती. यापूर्वी क्रीडा लवादाच्या न्यायालयाने निकाल देण्याची तारीख १० ऑगस्ट ठरवली होती. सहसा यासंबंधीच्या पॅनेलला निर्णय देण्यासाठी २४ तास दिले जातात. मात्र या खटल्याचा निकाल देण्यासाठी तारीख ठेवण्यात आली होती. १० तारखेलाही निकाल जाहीर न झाल्याने आजचा दिवस ठरवण्यात आला होता. मात्र आता आजच्या दिवसाचाही निकाल १६ तारखेवर ढकलल्याने विनेशला रौप्य पदक मिळणार की नाही अशी चर्चा सुरु झाली आहे. 

दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो फ्रीस्टाइल कुस्तीचा अंतिम सामना खेळला गेला. यानंतर दुसऱ्याच दिवशी विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. आई कुस्ती माझ्याकडून जिंकली. मी पराभूत झाले, माफ करा, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व भंगले. माझ्यात आता यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४, असं विनेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. यासोबत सर्वांची माफी मागत आपल्या सर्वांची सदैव ऋणी राहिल असेही विनेशने सांगितले. 

Web Title: Vinesh Phogat Case Verdict Updates Now the court decision for silver will come on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.