Vinesh Phogat : "हे एक मोठं षडयंत्र, यात सरकारचा हात", विनेश फोगाटच्या सासऱ्यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 02:04 PM2024-08-07T14:04:30+5:302024-08-07T14:07:57+5:30
Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर आता तिच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरलेल्या विनेश फोगाट हिला वजनी गटापेक्षा अधिक वजन भरल्याने स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. या घटनेमुळे भारताचं स्पर्धेतील एक हक्काचं पदक हुकल्यानं देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ५० किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे.
विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर आता तिच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेश फोगाटच्या कुटुंबीयांनी फेडरेशननं षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधला. यावेळी १०० ग्रॅम वजन किती जास्त असतं? डोक्यावरच्या केसांमुळंही १०० ग्रॅम वजन वाढू शकतं. सपोर्ट स्टाफनं कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही, असं म्हणत राजपाल राठी यांनी केंद्र सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राजपाल राठी म्हणाले की, "ही हृदयद्रावक बातमी असून त्यावर राजकारण केलं जात आहे. हे एक मोठं षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. १०० ग्रॅम वजनामुळे कोण बाहेर काढतं? डोक्यावरच्या केसांमुळेही १०० ग्रॅमपर्यंत वजन वाढतं. केस कापले तरी १०० ग्रॅम वजन कमी झालं असतं. तर मग त्यांना जेव्हा माहिती होतं की तिचं १०० ग्रॅम वजन जास्त आहे, तर तिचे केस कापायला हवे होते. तिच्यासोबत जे लोक होते, जो स्टाफ होता, त्यांनी अजिबात तिची मदत केली नाही."
याचबरोबर, "यामध्ये सरकार आणि कुस्ती फेडरेशनचा हात आहे. ती आपल्या लोकांना सोबत घेऊन गेली, पण त्यांना स्टेडियमच्या आत जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मी अद्याप विनेश फोगटशी बोललो नाही. पण, माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचं विनेशनं वारंवार सांगितलं होतं. विनेशनं जयपूर आणि इतर ठिकाणी अनेकदा हे वक्तव्य केलं आहे. काल ज्यावेळी मॅच झाली, त्यावेळी वजन का वाढलं नाही?," असा सवालही राजपाल राठी यांनी विचारला आहे.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५० किलो वजनी गटामधून खेळणाऱ्या विनेशचं वजन काही ग्रॅमनं अधिक वाढल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं. मात्र, आता या निर्णयाविरोधात अपील करण्याचा पर्याय भारताकडे आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी यासंदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांच्याशी चर्चा केली आहे. याशिवाय, याप्रकरणी भारताकडे उपलब्ध असलेल्या पर्यायांची चाचपणी केली जात आहे.