विनेशप्रमाणेच मेरी कोम अडचणीत आलेली; अवघ्या 4 तासांत कमी केले होते 2 kg वजन...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 02:55 PM2024-08-07T14:55:08+5:302024-08-07T14:55:36+5:30
विनेश फोगटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर खेळाडूंच्या वजनाची बरीच चर्चा सुरू आहे.
Vinesh Phogat Disqualified : भारतीय कुस्तीपटूविनेश फोगटला (Vinesh Phogat) अंतिम सामन्यापूर्वी वजन वाढल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेशचे वजन काही ग्रॅम जास्त आढळल्यामुळे तिच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, आता कुस्तीमधील वजनाशी संबंधित नियमांची चर्चा सुरू झाली आहे. लोकांचे म्हणणे आहे की, व्यायाम करुन विनेशला आपले काही ग्राम वजन कमी करता आले असते. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी अशाप्रकारे वजन कमी केले आहे. भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) अशाच प्रकारे काही वेळात आपले वजन कमी केले होते.
मेरी कोमचे काय प्रकरण आहे?
मेरी कोमने पोलंडमधील सिलेशियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी तिला 48 किलो वजनी गटात खेळायचे होते, परंतु तिचे दोन किलो वजन जास्त भरत होते. त्यावेळी मेरी कोमने या कॅटेगरीत अपात्र ठरू नये म्हणून अवघ्या चार तासांत दोन किलो वजन कमी केले होते. यासाठी तिने एक तास स्किपिंग आणि इतर व्यायाम करुन आपले वजन कमी केले होते.
खेळाडूंचे वजन इतक्या लवकरच कमी कसे होते?
तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की, ॲथलीट्स इतक्या लवकर आपले वजन कमी कसे करतात. तर, यासाठी ते आपला व्यायाम वाढवतात आणि यादरम्यान खास कपडे घालतात, ज्यामुळे व्यायाम करताना जास्त घाम येतो. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी लवकर कमी होते आणि वजनही झटक्यात कमी व्हायला मदत मिळते.
विनेश फोगटच्या प्रकरणात काय झाले?
आपण विनेश फोगटच्या केसबद्दल बोललो तर, तिला वजन कमी करण्यासाठी खुप कमी वेळ दिला गेला. कुस्तीच्या नियमांनुसार, सामन्यापूर्वी पैलवानांचे वजन केले जाते आणि वजन जास्त भरल्यास त्यांना वजन कमी करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ दिला जातो. विनेशच्या प्रकरणातही हेच झाले, तिला कमी वेळ मिळाला, ज्यामुळे ती आपले वजन कमी करू शकली नाही.