सरकारी नोकरी सोडून विनेश फोगटने निवडला ४ कोटींच्या बक्षिसाचा पर्याय; समोर आले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:58 IST2025-04-10T18:38:58+5:302025-04-10T18:58:11+5:30
हरियाणा सरकारने दिलेल्या बक्षिसांच्या चार पर्यायांपैकी एक पर्याय विनेश फोगटने निवडला आहे.

सरकारी नोकरी सोडून विनेश फोगटने निवडला ४ कोटींच्या बक्षिसाचा पर्याय; समोर आले कारण
Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ दरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटबद्दल मोठा खुलासा झाला आहे. ऑलिम्पिकमधून अपात्रतेच्या वादानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर, विनेशने राजकारणात प्रवेश केला आणि २०२४ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवून जिंकली. ऑलिम्पिकमधल्या वादानंतर हरियाणा सरकारने तिचा रौप्य पदकाच्या बरोबरीने सन्मान देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सरकारने तिच्यासमोर तीन पर्याय ठेवले होते, आता एक पर्याय विनेश फोगटने निवडला आहे.
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार विनेश फोगटने सरकारला तिने निवडलेला पर्याय सांगितली आहे. प्रशासनाने तिला सरकारी नोकरी, भूखंड किंवा ४ कोटी रुपयांचे रोख बक्षीस असे पर्याय दिले होते. २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये ती अंतिम फेरीत पोहोचली होती मात्र १०० ग्रॅम वजन वाढल्यामुळे, अंतिम सामना खेळण्यापूर्वीच तिला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री नायब सैनी यांनी फोगटला रौप्यपदक विजेता म्हणून सन्मानित करण्याची घोषणा केली होती.
मुख्यमंत्री सैनी यांच्या घोषणेनंतरही काहीही न मिळाल्याने विनेश फोगटने त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. विनेशने विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने मला रौप्य पदकाच्या बरोबरीचा सन्मान देण्याची घोषणा केली आहे. ८ महिने झाले, पण काहीही मिळालेले नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर विनेशसमोर तीन पर्याय ठेवण्यात आले होते. आता विनेशने यापैकी एक पर्याय निवडला असून त्याचे संमती पत्र सरकारला सोपवण्यात आले आहे.
विनेश फोगटने ४ कोटी रुपयांच्या रोख बक्षीसाचा पर्याय निवडला आहे. या संदर्भात हरियाणा सरकारच्या क्रीडा विभागाला पत्र पाठवण्यात आले आहे, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. विनेश फोगटने तिच्या पर्यायी निर्णयाबाबत क्रीडा विभागाला पत्र पाठवले आहे. विनेश आता आमदार असल्याने तिने सरकारी नोकरीचा पर्याय निवडला नाही. हरियाणा सरकार त्यांच्या क्रीडा धोरणांतर्गत, ऑलिंपियनसह उत्कृष्ट खेळाडूंना क्रीडा विभागात उपसंचालक स्तरावर नोकऱ्या देते.
दरम्यान, विनेश फोगट पॅरिस ऑलिंपिकमध्ये ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचला होती. ७ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या तिच्या सामन्यापूर्वी, विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त होते. यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आणि तिचे पदक हुकले. ८ ऑगस्ट २०२४ रोजी, फोगटने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती.