पॅरिसमध्ये नेमकं काय घडलं? विनेश फोगाटनं दिले 'आतली' गोष्ट बाहेर काढण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:16 PM2024-08-26T12:16:26+5:302024-08-26T12:25:26+5:30

शरीर थकलेलं नाही, पण मानसिकता ढासळलीये

Vinesh Phogat May Be Reveal Soon What Happened In Paris Olympics 2024 | पॅरिसमध्ये नेमकं काय घडलं? विनेश फोगाटनं दिले 'आतली' गोष्ट बाहेर काढण्याचे संकेत

पॅरिसमध्ये नेमकं काय घडलं? विनेश फोगाटनं दिले 'आतली' गोष्ट बाहेर काढण्याचे संकेत

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत फायनल गाठण्याचा इतिहास रचून विनेश फोगाटला मोकळ्या हाती मायदेशी परतावे लागले. १०० ग्रॅम वजन अधिक भरल्यानं तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले होते. रौप्य पदकासाठी तिने क्रीडा लवादाकडे धाव घेतली. पण इथंही निराशाच पदरी पडली. पदक जिंकले नसले तरी कुस्तीच्या आखाड्यातील रणरागिनीनं अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे तिचे मोठ्या थाटामाटात स्वागत  करण्यात आले.  

 

पॅरिसमध्ये काय घडलं? विनेश फोगाट लवकरच मौन सोडणार?

एका बाजूला भारतीय महिला कुस्तीपटूचा पदक विजेत्या खेळाडूप्रमाणे सत्कार होत असताना दुसऱ्या बाजूला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या विरुद्ध कट कारस्थान रचलं गेलं का? हा मुद्दाही चर्चेत आहे. लवकरच विनेश फोगाट यासंदर्भातील मौन सोडणार असल्याचे संकेत तिने दिले आहेत. ती आतली गोष्ट बाहेर आणणार का? पॅरिस ऑलिम्पिकसंदर्भात आलेल्या अनुभवावर ती  नेमकं काय आणि कधी व्यक्त होणार ही गोष्ट नक्कीच उत्सुकतेची असेल. 

शरीर थकलेलं नाही, पण...

माझं शरीर थकलेलं नाही, पण मानसिकरित्या मी ढासळले आहे. शांत बसून सर्व गोष्टींचा विचार करेन आणि भविष्यात काय करायचं यासंदर्भात निर्णय घेईन. पदक न मिळाल्यामुळे हताश होते. पण आज लोकांकडून जे प्रेम मिळतंय ते पाहून आनंदी आहे. यासारखी चांगली गोष्ट आणखी कोणती नाही, असेही तिने म्हटले आहे.

ऑलिम्पिकआधी या कारणामुळे चर्चेत होती विनेश फोगाट

पॅरिसमधील अनुभव कसा होता? यासंदर्भात विनेश फोगाट हिला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भारतीय कुस्तीपटू हिने लवकरच यासंदर्भात सर्वांसमोर मनातील सर्व गोष्टी व्यक्त करेन, असे तिने म्हटले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याआधी विनेश फोगाट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिली होती.  भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंपैकी ती एक आहे.  

तिच्या मनात काय सुरुये?

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत फायनल खेळण्यासाठी तिने जीवाची बाजी लावून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. पण १०० ग्रॅम वजन अतिरिक्त असल्यामुळे ऑलिम्पिक पदकाची सुवर्ण संधी हुकली. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिला फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातील ५० किलो वजनी गटात तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले. पण मूळत: ती  ५३ किलो वजनी गटातून खेळते. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकला जाण्याआधीपासून तिच्या विरुद्ध कटकारस्थान सुरु होते का? असा एक प्रश्न चर्चेत आहे. ज्यावेळी विनेश फोगाट यासंदर्भात सविस्तरपणे व्यक्त होईल, त्यावेळीच काही गोष्टींवर प्रकाश पडेल.

Web Title: Vinesh Phogat May Be Reveal Soon What Happened In Paris Olympics 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.