Vinesh Phogat, Paris Olympics 2024: विनेशची काही चूक नाही, भारताचं गोल्ड मेडल 'त्या' लोकांमुळे हुकलं- पंजाब CM भगवंत मान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 12:05 PM2024-08-08T12:05:49+5:302024-08-08T12:07:03+5:30
Vinesh Phogat, Paris Olympics 2024: गोल्ड मेडल मॅचच्या काही वेळ आधी वजन जास्त असल्याने विनेश फोगाटला ठरवण्यात आलं स्पर्धेसाठी अपात्र
Vinesh Phogat Retirement after Disqualified at Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. पण बुधवारी त्या अपेक्षांना एक सुरुंग लागला. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ही सुवर्णपदकाचा सामना खेळण्याच्या काही वेळ आधी अपात्र ठरली. ५० किलो वजनी गटात खेळण्यासाठी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. आपले वजन जास्त झाल्याची कुणकुण तिला आदल्या रात्रीच लागली होती. तिने आपले केस कमी केले, रक्त काढलं, नखं कापली आणि बरेच उपाय करुन पाहिले. पण अखेर तिचे वजन आटोक्यात आले नाही. या धक्क्यातून सावरु न शकल्याने आज विनेश फोगाटने तडकाफडकी आपली निवृत्ती जाहीर केली. हा निर्णय सर्वच भारतीयांसाठी धक्कादायक आहे. या दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक प्रतिक्रिया दिली.
"बुधवारी मी फोगाट यांच्या घरी गेलो होतो. ही बाब खूपच वेदनादायी आहे की ऑलिम्पिकमध्ये आपल्याला सुवर्णपदक मिळणारच होतं, पण ते हिरावून घेण्यात आलं. विनेशचे काका आणि कोच असलेले फोगाट यांनी मला सांगितलं की वजन आधीही केलं जातं आणि नंतर स्पर्धेसाठी अधिकृत वजन केलं जातं. खेळाडूंकडे त्यांचे वजनाचे मशिन असते. त्यावर आधी या गोष्टी चेक केल्या जाऊ शकतात. जर १०० ग्रॅमचाच फरक होता तर तिचे केस कापता येऊ शकत होते. कारण तिच्या केसांचे वजन २०० ग्रॅम होते. पण कुणी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. आपले कोच, फिजिओ तिकडे काय करायला गेलेत, कुणास ठाऊक? त्यामुळे आपलं सुवर्ण पदक हुकलं. विनेश फोगाटची काहीच चूक नाही, आसपासच्या कोचिंग स्टाफमुळे गोल्ड मेडल हातून गेलं," असे भगवंत मान म्हणाले.
#WATCH | Punjab CM Bhagwant Mann says, "Yesterday I went to (Vinesh) Phogat's house. It is very sad that an Olympic gold medal was taken away. Her coach and uncle told me that her hair could have been cut. It was a matter of 100 grams, her hair could have been cut. I don't know… pic.twitter.com/ANV04q99Ef
— ANI (@ANI) August 8, 2024
दरम्यान, बुधवारच्या सगळ्या गोंधळानंतर भारतीय कुस्तीपटूविनेश फोगटने कुस्तीला अलविदा केले. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. विनेश फोगटने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, "मला मातेसमाने असलेल्या कुस्तीने माझ्यावर विजय मिळवला, मी हरले, मला माफ करा! तुमचे स्वप्न, माझा संयम सारं काही आता तुटून गेलंय, आता माझ्यात आणखी लढण्याची ताकद नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी तुम्हा सर्व देशवासीयांची कायम ऋणी राहिन," असे त्या पोस्टमध्ये विनेश फोगाटने म्हटले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विनेश फोगाटने कुस्तीला 'आई' असं संबाधले आहे.