भारतीय कुस्तीत पुन्हा 'राडा', विनेश फोगाटने WFI अध्यक्षांवर लावले गंभीर आरोप, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 04:54 PM2024-04-12T16:54:46+5:302024-04-12T16:56:17+5:30
काही महिन्यांपूर्वी भारतातील दिग्गp कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन पुकारले होते.
Vinesh Phogat : काही महिन्यांपूर्वी भारतातील दिग्गज कुस्तीपटूंनीकुस्ती महासंघाविरोधात आंदोलन पुकारले होते. आता हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे, विनेश फोगट (Vinesh Phogat) हिने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष संजय सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप विनेशने केला आहे. तसेच, आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाण्याची भीतीही तिने व्यक्त केली आहे.
29 वर्षीय विनेश फोगटने 2019 आणि 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 53 किलोमध्ये कांस्यपदक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत (2018) 50 किलोमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. पुढील आठवड्यात किर्गिस्तानमधील बिश्केक येथे होणाऱ्या आशियाई पात्रता स्पर्धेद्वारे विनेशला 50 किलो वजनी गटात ऑलिम्पिक कोटा गाठायचा आहे. नुकत्याच पतियाळा येथे झालेल्या निवड चाचणीत 50 व्यतिरिक्त विनेशने 53 किलो वजनी गटातही भाग घेतला. 53 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तिचा पराभव झाला. मात्र 50 किलो वजनी गटात विजय मिळवल्यामुळे विनेशला आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी प्रवेश मिळाला.
19th अप्रैल को एशियन ओलम्पिक क्वालीफाई टूर्नामेंट शुरू होने जा रहा है। मेरे द्वारा लगातार एक महीने से भारत सरकार (SAI,TOPS) सभी से मेरे कोच और फिजियो की ACCREDITATION (मान्यता) के लिए रिक्वेस्ट की जा रही है। ACCREDITATION के बिना मेरे कोच और फिजियो का मेरे साथ कम्पटीशन ARENA में…
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) April 12, 2024
विनेशने X वर एका लांबलचक पोस्टमध्ये लिहिले की, 'ब्रिजभूषण शरणसिंह आणि त्यांनी ठेवलेले डमी संजय सिंग, मला ऑलिम्पिकमध्ये खेळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मला डोपिंगमध्ये अडकवण्याचा कट रचला जाऊ शकतो. संघात नियुक्त केलेले प्रशिक्षक ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे माझ्या सामन्यादरम्यान त्यांच्याकडून पाण्यात काहीतरी मिसळून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमचा मानसिक छळ करण्यात कोणतीही कसर सोडली जात नाहीये.'
'आशियाई ऑलिम्पिक पात्रता 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. माझे प्रशिक्षक आणि फिजिओ, यांना परवानगी मिळवण्यासाठी मी भारत सरकारला एका महिन्यापासून विनंती करत आहे. ओळखपत्राशिवाय माझे प्रशिक्षक आणि फिजिओ माझ्यासोबत स्पर्धा संकुलात जाऊ शकत नाहीत. वारंवार विनंती करुनही ठोस प्रतिसाद मिळत नाही. कोणीही मदत करायला तयार नाही. आम्ही लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे आमच्यासोबत राजकारण केला जात आहे. आपल्याच देशात चुकीच्या विरोधात आवाज उठवण्याची ही शिक्षा आहे का? असा सवालही तिने विचारला.