विनोद राय बीसीसीआय संचालन समितीचे प्रमुख
By admin | Published: January 31, 2017 04:40 AM2017-01-31T04:40:35+5:302017-01-31T04:40:35+5:30
सर्वच युक्तिवाद फेटाळून लावताना भारतीय क्रिकेट बोर्डाच्या(बीसीसीआय) संचालन समितीची जबाबदारी माजी नियंत्रक व महालेखाकार विनोद राय यांच्याकडे सोपविण्यात
नवी दिल्ली : सर्वच युक्तिवाद फेटाळून लावताना भारतीय क्रिकेट बोर्डाच्या(बीसीसीआय) संचालन समितीची जबाबदारी माजी नियंत्रक व महालेखाकार विनोद राय यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ही समिती क्रिकेटमधील सुधारणांसाठी लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणार आहे.
या समितीतील सदस्यांमध्ये क्रिकेटचे इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा, आयडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांचा समावेश आहे. समिती कामकाजासंदर्भात बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांच्यासोबत सल्लामसलत करेल.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन नावांना मंजुरी बहाल केली. आयसीसी बैठकीत विक्रम लिमये हे बोर्डाचे क्रिकेट प्रशासक म्हणून तसेच अमिताभ चौधरी आणि अनिरुद्ध चौधरी हे बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत.
खंडपीठाने प्रशासकांच्या समितीत चार सदस्यांचा समावेश करण्याची अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची विनंती फेटाळून लावली. क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांना प्रशासक म्हणून घ्यावे असा युक्तिवाद रोहतगी यांनी केला होता. १८ जुलै २०१६च्या न्यायालयाच्या आदेशात मंत्री व सरकारी कर्मचाऱ्यांना बीसीसीआयमध्ये कुठलेही पद स्वीकारता येणार नाही, याकडे खंडपीठाने रोहतगी यांचे लक्ष वेधले. प्रशासकांची ही समिती आजपासून ४ आठवड्यांत सुधारणांसंबंधी शिफारशींचा अहवाल न्यायालयाला सोपविणार आहे. प्रशासकांच्या नावांची शिफारस न्यायालय मित्र अनिल दिवाण, गोपाल सुब्रमण्यम, हिमाचलसह अनेक राज्य संघटनांकडून यक्तिवाद करणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सीलबंद लिफाफ्यात केली. बीसीसीआयकडून ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी आयसीसीच्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान आयोजित बैठकीसाठी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नावांची यादी खंडपीठाला सोपविली होती. (वृत्तसंस्था)
माझी भूमिका नाईट वॉचमनची : राय
सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त प्रशासकांच्या चार सदस्यांच्या समितीचे प्रमुख भारताचे माजी नियंत्रक व महालेखाकार विनोद राय यांनी स्वत:ला ‘नाईट वॉचमन’ म्हटले आहे. बीसीसीआयच्या निर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये कुठली अडचण येऊ नये, हे निश्चित करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
राय म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयातर्फे मिळालेल्या या आदराचा स्वीकार करण्यासाठी आपल्यातर्फे सर्वोत्तम प्रयत्न व्हायला हवा. मी क्रिकेट या खेळाचा खरा प्रशंसक आहे. याबाबत माझी भूमिका ‘नाईट वॉचमन’सारखी राहील. आम्हाला सुशासन, चांगली व्यवस्था व दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
त्यामुळे पदाधिकाऱ्यांची निवडणूक योग्य पद्धतीने होईल. खेळाला चांगल्या प्रशासनाची गरज आहे. खेळाडूंसाठीही ते आवश्यक आहे. खेळाच्या चाहत्यांसाठीही ते गरजेचे आहे.’’
भारताच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे प्रतीक असलेले रॉय म्हणाले, ‘‘सध्याच मी कुठल्याही प्रकारची टिप्पणी करणार नाही. कारण मला सध्या याबाबत अधिक माहिती नाही. बीसीसीआयच्या कार्याबाबत ओळख झालेली नाही.’’
(वृत्तसंस्था)
खेळाडूंची संघटना, महिला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार : एडलजी
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांना बदललेल्या बीसीसीआयमध्ये भूमिका मिळण्याची आशा होती. सर्वोच्च न्यायालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या चार प्रशासकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर नव्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज असल्याची प्रतिक्रिया डायना यांनी व्यक्त केली.
महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि खेळाडूंच्या संघटनेची स्थापना करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. एडलजी म्हणाल्या, ‘‘न्यायमित्र गोपाल सुब्रमण्यमने मला यात सहभागी होण्यास इच्छुक आहात का, अशी विचारणा केली होती. मी त्यांना होकार कळवला होता. मला एखादी भूमिका बजावावी लागेल, अशी आशा होती, पण प्रशासकांच्या पॅनलमध्ये स्थान मिळाल्यामुळे आश्चर्य वाटले. सर्वोच्च न्यायालयाने माझ्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली असून त्याला न्याय देण्यास प्रयत्नशील राहीन.’’
प्रशासनाच्या अनुभवाबाबत बोलताना माजी क्रिकेटपटू म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षे रेल्वेच्या विविध संघांना सांभाळल्यामुळे अनुभव मिळाला आहे, पण बीसीसीआयमध्ये काम करणे मोठी बाब आहे. मी रेल्वेमध्ये ४० संघांना सांभाळले आहे. त्यामुळे मला प्रशासकीय अनुभव मिळाला आहे. बीसीसीआय मोठी संस्था आहे आणि त्याचे दडपण वेगळे राहील. आम्ही भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करू.’’