ड्रेसिंग रूमच्या वादात मीडियानं डोकावू नये, कुंबळे शानदार प्रशिक्षक- विनोद राय
By admin | Published: June 25, 2017 01:39 PM2017-06-25T13:39:21+5:302017-06-25T13:39:21+5:30
सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनीही कोहली आणि कुंबळेच्या वादावर प्रतिक्रिया दिली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25- सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनीही कोहली आणि कुंबळेच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. विनोद राय यांनी भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची स्तुती केली आहे. भारतीय टीम चांगला खेळ करत असून, त्यांच्यातील एकी कायम राहील हे आम्ही सुनिश्चित करणार आहोत.
कोहलीला कुंबळेची काम करण्याची पद्धत आवडत नसल्यानंच कुंबळेनं राजीनामा दिला आहे. मीडियानं या प्रकरणात जास्त लक्ष घालू नये, असा सल्लाही विनोद राय यांनी दिला आहे. सीओएच्या बैठकीनंतर ते म्हणाले, जर दोन माणसांना सात दिवस 24 तास एकत्र ठेवल्यास कदाचित त्यांच्यात मतभेद होऊ शकतील. एखाद्या संघातील कर्णधार आणि प्रशिक्षक दोघांची भिन्न मते असल्यास त्यानं व्यावसायिक तोटा होतो. कुंबळे हे परिपक्व व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच त्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. शेवटी कर्णधारालाच मैदानावर खेळावं लागतं.
कुंबळेंची भूमिका पूर्णतः योग्य होती. त्यांनी एक प्रशिक्षक म्हणून फार चांगलं काम केलं आहे. आम्ही भारतीय संघ एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करू, मग तो कर्णधार असू देत किंवा मॅनेजर, संघात एकोपा टिकला पाहिजे. कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या वादात मीडियानं डोकं न घालता कोणत्याही निष्कर्षापर्यंत येऊ नये. भारतीय मीडिया घर आणि बेडरूममध्ये डोकावत नाही, त्यामुळे कृपा करून मीडियानं ड्रेसिंग रूममध्येही डोकावून पाहू नये, असा सल्ला राय यांनी मीडियाला दिला आहे.