विराटपर्वाचा विजयी प्रारंभ
By admin | Published: January 16, 2017 05:12 AM2017-01-16T05:12:32+5:302017-01-16T05:12:32+5:30
इंग्लंडची पहाडाएवढी धावसंख्यादेखील खुजी ठरवत पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात तीन विकेटने थरारक विजय नोंदविला
पुणे : कर्णधार विराट कोहलीचा सदाबहार फॉर्म आणि केदार जाधवची डोळ्यांचे पारणे फेडणारी जिगरबाज शतकी खेळी या जोरावर भारताने रविवारी येथे सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत इंग्लंडची पहाडाएवढी धावसंख्यादेखील खुजी ठरवत पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात तीन विकेटने थरारक विजय नोंदविला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेतही भारताने १-0 अशी आघाडी घेतली.
नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंडने विजयासाठी दिलेले लक्ष्य भारताने ४८.१ षटकांत ७ बाद ३५६ धावा करीत पूर्ण केले. भारताकडून विराट कोहलीने १0५ चेंडूंत ८ चौकार ५ षटकारांसह १२२ आणि केदार जाधव याने ७६ चेंडूंत १२ चौकार व चार उत्तुंग षटकारांसह भारताच्या दिमाखदार विजयात निर्णायक खेळी केली. हे दोघे परतल्यानंतर हार्दिक पांड्याने ३७ चेंडूंत नाबाद ४0 धावा करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
विजयाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात सनसनाटी झाली. पहिल्या ११.५ षटकांतच भारताने सलामीवीर के एल राहुल (८) आणि शिखर धवन (१) यांच्यासह युवराजसिंग आणि महेंद्रसिंह धोनी (६) यांना गमावले. यात विली याने डावाच्या चौथ्या व पाचव्या षटकांत शिखर धवन आणि राहुल यांना तंबूत धाडले. शिखर धवनला अलीकरवी झेलबाद केले, तर राहुलला त्रिफळाबाद केले. हे दोघे परतल्यानंतर २ बाद २४ अशी भारताची स्थिती झाली. त्यात भरीस भर स्टोक्सने पुनरागमन करणाऱ्या युवराजसिंगला बटलरकरवी आणि धोनीला विली याच्या हाती झेल देण्यास भाग पाडत भारताची स्थिती ११.५ षटकांत ४ बाद ६३ अशी केली. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि पुणेकर केदार जाधव यांनी भारताचा डाव सावरलाच नाही, तर विजयाच्या आशा प्रज्वलित केल्या. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला करीत भारताची धावसरासरी उंचावत ठेवली. केदार जाधवने तर घरच्या मैदानावर चौकार व षट्कारांची आतषबाजी करीत कर्णधार विराट कोहलीला सुरेख साथ दिली.
विराट कोहलीने डावाच्या ३२ व्या षटकात ख्रिस वोक्सला उत्तुंग षटकार ठोकताना ९३ चेंडूंत ७ चौकार आणि ४ टोलेजंग षटकारांसह शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर विराटने धावा काढण्याचा सपाटा आणखी वाढवला; परंतु ही जमलेली जोडी स्टोक्सने जबरदस्त फार्मात असणाऱ्या विराट कोहली याला विली याच्या हाती झेल देण्यास भाग पाडत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. कर्णधार परतल्यानंतर केदार जाधवने धावांची गती वाढविण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेताना हार्दिक पांड्या याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी २३ चेंडूंत २८ धावांची भर भारताच्या धावसंख्येत घातली. तथापि, भारताला ६१ चेंडूंत विजयासाठी ६0 धावांची गरज असताना केदार जाधव बॉलच्या चेंडूंवर जोरदार पूल मारण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगला स्टोक्सच्या हाती झेल देऊन बाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला. त्यातच ४५व्या षटकात बॉलने रवींद्र जडेजाला राशीदकरवी झेलबाद करताना भारताला सातवा धक्का देत सामन्यात चुरस वाढवली; परंतु हार्दिक पांड्या याने एका बाजूने झुंजार फलंदाजी करीत भारताला १२ चेंडू बाकी असताना आश्विनच्या साथीने ४ षटकांत ३८ धावांची भागीदारी करीत भारताचा विजय सुकर केला. ४८व्या षटकात पांड्याने राशीदला, तर आश्विन याने मोईन अली याला षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, वेगवान गोलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीचा अचूक फायदा उचलताना इंग्लंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात मजबूत फटकेबाजी करताना भारतापुढे विजयासाठी ३५१ धावांचे ‘विराट’ आव्हान ठेवले होते. जो रुट (७८), जेसन रॉय (७३) आणि बेन स्टोक्स (६२) यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३५० धावांची भक्कम मजल मारली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहली याने नेतृत्व करीत असलेल्या आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडला फलंदाजीस निमंत्रित केले. रात्री पडणाऱ्या दवाचा परिणाम लक्षात घेऊन कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली; परंतु त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनीच चुकीचा ठरविला. तब्बल २२ अवांतर धावांची खैरात करून भारतीयांनी इंग्लंडच्या भल्या मोठ्या धावसंख्येला हातभारच लावला. (वृत्तसंस्था)
>धा व फ ल क
इंग्लंड : जेसन रॉय यष्टिचित गो. जडेजा ७३, अॅलेक्स हेल्स धावबाद (बुमराह) ९, जो रुट झे. पांड्या गो. बुमराह ७८, इयॉन मॉर्गन झे. धोनी गो. पांड्या २८, जोस बटलर झे. धवन गो. पांड्या ३१, बेन स्टोक्स झे. यादव गो. बुमराह ६२, मोइन अली त्रि. गो. यादव २८, ख्रिस वोक्स नाबाद ९, डेव्हीड विली नाबाद १०. अवांतर - २२. एकूण : ५० षटकांत ७ बाद ३५० धावा.
गोलंदाजी : उमेश यादव ७-०-६३-१; हार्दिक पांड्या ९-०-४६-२; जसप्रीत बुमराह १०-०-७९-२; रवींद्र जडेजा १०-०-५०-१; रविचंद्रन आश्विन ८-०-६३-०; केदार जाधव ४-०-२३-०; युवराज सिंग २-०-१४-०.
भारत : के.एल. राहूल त्रि.गो.विली ८, शिखर धवन झे. अली गो. विली १, विराट कोहली झे. विली गो. स्टोक्स १२२, युवराज सिंग झे. बटलर गो. स्टोक्स १५, धोनी झे. विली गो. बॉल ६, केदार जाधव झे. स्टोक्स गो. बॉल १२०, हार्दिक पांड्या नाबाद ४०, रविंद्र जडेजा झे. रशिद गो. बॉल १३, आर.अश्विन नाबाद १५. अवांतर १६.
एकूण ४८.१ षटकात ७ बाद ३५६.
गोलंदाजी : ख्रिस वोक्स ८-०-४४-०, विली ६-०-४७-२, बॉल १०-०-६७-३, स्टोक्स- १०-०-७३-२, रशिद ५-०-५०-०
>१४७ चेंडूंत २00 धावांची भागीदारी
विराट कोहली आणि केदार जाधव या दोघांनी पाचव्या गड्यासाठी १४७ चेंडूंतच २00 धावांची भक्कम भागीदारी केली.
यामध्ये विराटचा वाटा होता ९५ धावांचा तर केदारचा हिस्सा होता १0२ धावांचा. ११. ५ षटकांत सुरु झालेली ही भागीदारी ३६.२ षटकांत तुटली.