टी-२० मानांकन फलंदाजांमध्ये विराट 1 NO
By admin | Published: February 2, 2016 03:26 AM2016-02-02T03:26:05+5:302016-02-02T03:26:05+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणारा भारतीय फलंदाज विराट कोहली याने आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अॅरोन फिंचला
दुबई : आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणारा भारतीय फलंदाज विराट कोहली याने आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अॅरोन फिंचला पिछाडीवर टाकताना अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसीतर्फे जाहीर झालेल्या क्रमवारीत कोहलीने मालिकेत ४७ मानांकन गुणांची कमाई केली. तो ८९२ मानांकन गुणांसह फिंचपेक्षा आघाडीवर आहे.
कोहलीने ३ सामन्यांत अनुक्रमे नाबाद ९०, नाबाद ५९ आणि ५० धावांची खेळी केली. फिंचने अॅडिलेडमध्ये ४४ आणि मेलबोर्नमध्ये ७४ धावा फटकावल्या. त्याने १४ मानांकन गुणांची कमाई केली. स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतील अखेरच्या लढतीतून माघार घ्यावी लागली.
भारताच्या सुरेश रैनाने तीन स्थानांची प्रगती करताना १३वे स्थान पटकावले. सलामीवीर रोहित शर्माने चार स्थानांची प्रगती करताना १६वे स्थान पटकावले.
पहिल्या लढतीत १७ धावा फटकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरची ६ स्थानांनी घसरण झाली. तो १८व्या स्थानी आहे. गोलंदाजांच्या मानांकनामध्ये वेस्ट इंडीजचा सुनील नारायण अव्वल स्थानी कायम आहे, तर त्याचा मायदेशातील सहकारी सॅम्युअल बद्री दुसऱ्या स्थानी आहे. संघांच्या मानांकनामध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी आहे, तर आॅस्ट्रेलियाची आठव्या स्थानी घसरण झाली.