‘विराट’ वाद; कुंबळेला विरोध करणाऱ्या खेळाडूंना घरचा रस्ता दाखवा
By Admin | Published: June 22, 2017 06:08 AM2017-06-22T06:08:49+5:302017-06-22T06:08:49+5:30
अनिल कुंबळेने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता त्याच्या बाजूने काही माजी क्रिकेटपटू उभे राहिले आहेत.
मुंबई : अनिल कुंबळेने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता त्याच्या बाजूने काही माजी क्रिकेटपटू उभे राहिले आहेत. लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी तर विराट कोहलीचे नाव न घेता अनेक टोले लगावले. ‘जे खेळाडू तक्रार करताहेत, त्यांनाच संघातून घरचा रस्ता दाखवा,’ असेही गावस्कर यांनी म्हटले आहे. भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्याशी नरमाईने वागणारा प्रशिक्षक हवा आहे का? तुम्हाला आज बरे वाटत नाही, मग सराव करू नका, सुट्टी घ्या. शॉपिंगला जा. असे म्हणणारा प्रशिक्षक हवा असेल तर, अनिल कुंबळे त्यामध्ये फीट बसत नाही, असा टोला गावसकर यांनी लगावला. कुंबळेने मागच्या वर्षभरात संघाला जे मिळवून दिलेय ते असामान्य आहे. कुंबळेनंतर येणाऱ्या नव्या प्रशिक्षकाला आपण काय संदेश देणार आहोत? एकतर खेळाडूंच्या विचारांशी जुळवून घे किंवा कुंबळेसारखा असशील तर पायउतार हो. हे खूपच वाईट असल्याचे गावसकर यांनी म्हटले आहे. दोन किंवा तीन पेक्षा जास्त लोक असतील तर मतभेद असतात. कुंबळे यांनी प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर भारताने अनेक विजय मिळवले. वर्षभरात कुंबळेने काही चुकीचे केल्याचे मला वाटत नाही, असे गावसकर म्हणाले.
- वर्षभर टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी होण्याचे श्रेय कर्णधार, संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफला देतो. माझ्या स्टाईलवर आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहाण्यावर कर्णधाराचा आक्षेप असल्याचे पहिल्यांदाच समजले. मला धक्का बसला आहे. बीसीसीआयने आमच्यातील मतभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला असे वाटते की, आता हे पद सोडण्याची वेळ आली आहे.
- अनिल कुंबळे
- बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल. - राजीव शुक्ला,
वरिष्ठ अधिकारी, बीसीसीआय