विराट बालिश, गर्विष्ठ!
By admin | Published: March 30, 2017 01:32 AM2017-03-30T01:32:32+5:302017-03-30T01:32:32+5:30
‘आॅस्ट्रेलियाचे खेळाडू आता माझे मित्र राहिले नाहीत, असे वक्तव्य करीत मालिका संपल्यानंतर मोठ्या मनाने प्रतिस्पर्धी संघाशी हात
मेलबोर्न : ‘आॅस्ट्रेलियाचे खेळाडू आता माझे मित्र राहिले नाहीत, असे वक्तव्य करीत मालिका संपल्यानंतर मोठ्या मनाने प्रतिस्पर्धी संघाशी हात मिळविणे टाळल्याप्रकरणी भारतीय कर्णधार विराट कोहली याला आॅस्ट्रेलियन मीडियाने बालिश आणि गर्विष्ठ संबोधले आहे.
रांची कसोटीतील कृत्याबद्दल कोहलीनेही माफी मागायला हवी होती. पण त्याने तसे काहीच केले नाही, असेही एका आॅस्ट्रेलियन वृत्तपत्रात छापून आले आहे. बॉर्डर-गावसकर मालिका संपुष्टात आली असली तरी, आॅस्ट्रेलियन मीडियाने भारताचा कर्णधार विराट कोहलीविरोधात उघडलेली मोहीम संपलेली दिसत नाही. कोहलीची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केल्यानंतर आता आॅस्ट्रेलियातील मीडियाने पुन्हा एकदा कोहलीवर टीका केली आहे. विराट कोहली बालिश आणि गर्विष्ठ असल्याचे आॅस्ट्रेलियातील ‘डेली टेलिग्राफ’ वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे.
मालिका जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने आॅस्ट्रेलियन क्रि केटपटूंबाबत बोलताना ते आता आपले मित्र राहिलेले नाहीत, असे वक्तव्य केले होते. कोहलीच्या या विधानावर ‘डेली टेलिग्राफ’ने विराटची प्रतिक्रि या बालिशपणा असल्याचे म्हटले असून, मालिका आटोपल्यानंतर बीअर पिण्याचे स्मिथचे आमंत्रणही विराटने उर्मटपणे फेटाळून लावल्याचे म्हटले आहे. कोहलीने मालिका संपल्यानंतर मोठ्या मनाने प्रतिस्पर्धी संघाशी हात मिळविला पाहिजे होता, पण तसे न करता आपण स्तरहीन असल्याचे त्याने सिद्ध केले, असे आॅस्ट्रेलियातील माध्यमांनी म्हटले आहे. कोहली गर्विष्ठ असल्याचीही टीका करण्यात आली.
स्मिथने मुरली विजयबद्दल काढलेल्या अपशब्दांबद्दल जाहीरपणे माफीदेखील मागितली, मग रांची कसोटीतील कृत्याबद्दल कोहलीनेही माफी मागायला हवी होती. पण त्याने तसे काहीच केले नाही, असेही एका आॅस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रकाशित झाले. टीकेबद्दल कोहलीचे चाहते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवाज उठवला होता. भारतीय संघातील क्रिकेटपटूंनीही आॅस्ट्रेलियातील मीडियाकडून केल्या जाणाऱ्या टीकेला दुर्दैवी ठरवले होते. आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यानेही आॅस्ट्रेलियन मीडियाचा कोहलीला बदनाम करण्याचा डाव आखल्याचे सांगत निशाणा साधला होता. असे असतानाही ‘द आॅस्ट्रेलियन’ने कोहलीला लक्ष्य केले. डीआरएस प्रकरणावरही स्मिथने स्पष्टीकरण दिले. कोहलीने मात्र स्मिथला दिलेल्या वागणुकीवर कुठलीही दिलगिरी व्यक्त केली नाही, हे दुर्दैवी नाही का? असा सवाल माध्यमांनी उपस्थित केला. (वृत्तसंस्था)
स्मिथच्या प्रामाणिकपणाचे सीएकडून कौतुक
स्टीव्ह स्मिथने मालिकेदरम्यान अनेकदा भावनेच्या भरात चुकीचे वर्तन केल्याबद्दल माफी मागितली, तसेच चुकांची कबुली दिल्याबद्दल क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आपल्या कर्णधाराच्या प्रामाणिक हेतूचे तसेच संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. संघाच्या प्रयत्नांवर आम्हाला गर्व वाटतो. या दौऱ्यात खेळाडूंची समर्पितवृत्ती आणि प्रामाणिक हेतू यामध्ये कसलीही उणीव जाणवली नसल्याचे सीएने म्हटले आहे.
परिपक्वता दाखवायला हवी!
क्रिकेटपटूसोबत आणि विरोधात खेळतच असतात. अशा वेळी कटुता टाळायला हवी. एखाद्या मालिकेत मनाविरुद्ध काही घडल्यास निराशा वाढते. पण संयम बाळगणे अर्थात परिपक्व होणे हे चांगुलपणाचे
लक्षण ठरते.- मार्क टेलर.
क्रिकेट केवळ जय-पराजयापुरते मर्यादित नाही तर खेळता खेळता
तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनू शकता, हे विराटने शिकायला हवे.- डीन जोन्स.
मैदान आणि मैदानाबाहेर कसे वागायचे, यासाठी विराटने महान सचिन तेंडुलकरकडून मार्गदर्शन घ्यावे. सचिन याबाबत सर्वांचा आदर्श खेळाडू ठरतो.
- डेव्हिड लॉईड, इंग्लंड.
विराटचे वक्तव्य निराशादायी असले तरी ते त्याचे मत आहे. अन्य भारतीय खेळाडू विराटच्या वक्तव्याशी सहमत असतीलच असे नाही. मी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वावर फारच प्रभावित आहे.
- डॅरेन लेहमन