विराटची सचिन आणि सलमान खानवर मात
By admin | Published: June 26, 2017 08:51 AM2017-06-26T08:51:59+5:302017-06-26T08:51:59+5:30
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने अभिनेता सलमान खान आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने सर्वाधिक फेसबुक फॉलोअर्सच्या यादीत अभिनेता सलमान खानसह सचिन तेंडुलकर, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रासारख्या सेलिब्रेटींना मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे. फेसबुकवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या ३५,७२५, ७१९ इतकी झाली आहे. याआधी सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूडचा दबंग खान सलमान अव्वल स्थानावर होता. पण विराटने त्यालाही मागे टाकलं आहे. या यादीत सलमान दुसऱ्या स्थानावर, दीपिका पादूकोण तिसऱ्या स्थानावर आणि प्रियांका चोप्रा चौथ्या स्थानी आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीमध्ये सहाव्या स्थानावर आहे.
काही दिवसांपूर्वीच आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये विराटने अव्वल स्थान मिळवलं होतं. त्यानंतर आता सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या यादीतही विराटने अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. फेसबुकच्या 35,434,956 फॉलोअर्सबरोबरच ट्विटरवर कॅप्टन कोहलीचे 16 दशलक्ष आणि इन्स्टाग्रामवर 14 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. यावर्षी झालेल्या टेस्ट मॅचमध्ये तसंच नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील विराटच्या खेळीमुळे त्याच्या लोकप्रियतेमध्ये आणखी भर पडली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटने उत्तम खेळी केली होती पण पाकिस्तान विरोधात झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या सामन्यानंतर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनाम दिला. कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर झालेल्या वादामुळे विराटवर क्रिकेटविश्वातून तसंच फॅन्सकडून टीका झाली होती. पण त्याचा कोणताही परिणाम विराटच्या फॉलोअर्सच्या संख्येवर झाला नाही, असं चित्र बघायला मिळतं आहे.
काही दिवसांपूर्वी फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वात जास्त मानधन असलेल्या सेलिब्रेटींच्या यादीतही विराटला स्थान देण्यात आलं होतं. या यादीत विराट 89व्या क्रमांकावर आहे. 22 मिलीअन डॉलर इतकं त्याचं वार्षीक उत्पन्न असल्याने त्याला फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळालं आहे. तसंच गेल्या वर्षीच्या "एएसपीएन वर्ल्ड फेम 100" मध्ये विराट 13 व्या स्थानी होता.
सध्या टीम इंडिया वेस्ट इंडिजविरूद्धच्या सिरीजमध्ये व्यस्त आहे. या सीरिजमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामान्यात विराटची शानदार खेळी क्रिकेटप्रेमींना बघायला मिळाली. विराट कोहलीने या सामन्यात 87 रन्सचा आकडा गाठला.