"विराट" बंगळुरूचा 49 धावांत खुर्दा, कोलकाताचा "रॉयल" विजय
By admin | Published: April 23, 2017 11:30 PM2017-04-23T23:30:30+5:302017-04-24T07:10:56+5:30
कोलकाता नाइट रायडर्सने धमाकेदार विजय मिळवताना रॉयल चँलेंजर्स बँगलोरचा अवघ्या ४९ धावांत खुर्दा पाडून ८२ धावांनी बाजी मारली
इडन गार्डनवर झालेल्या या सामन्याला कमालीची कलाटणी मिळाली. आधी आरसीबीच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवताना केकेआरला घरच्या मैदानावर १३१ धावांवर रोखले. यावेळी आरसीबी सहज बाजी मारणार अशीच शक्यता होती. कर्णधार विराट कोहली, धोकादायक ख्रिस गेल आणि धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स अशी जबरदस्त फलंदाजी असलेल्या आरसीबीला हे आव्हान अजिबात कठिण नव्हते. शिवाय केदार जाधव, मनदीप सिंग, स्टुअर्ट बिन्नी असे शिलेदारही केकेआरला चोपण्यास सज्ज होते. परंतु, केकेआरने जबरदस्त मारा करताना सामनाच पलटवला.
ख्रिस वोक्सने पहिल्याच षटकात कोहलीला बाद करुन बँगलोरला मोठा धक्का दिला. या पहिल्याच मजबूत धक्क्याने जणूकाही बँँगलोरच्या आत्मविश्वासालाच तडा गेला आणि एकामागून एक फलंदाज बाद व्हायला लागले. बघता बघता अवघ्या ४९ धावांमध्ये संपुर्ण संघ तंबूत परतला आणि एकवेळ पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या केकेआरने अनपेक्षित बाजी मारली. नॅथन कुल्टर-नाइल, वोक्स आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी प्रत्येकी ३ बळी घेत आरसीबीचे कंबरडे मोडले. उमेश यादवने एक बळी घेतला. विशेष म्हणजे बँगलोरच्या एकाही फलंदाजा दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. केदार जाधवने सर्वाधिक ९ धावा काढल्या.
तत्पूर्वी, सुनील नरेनने पुन्हा एकदा सलामीला येत अपेक्षित आक्रमक सुरुवात करताना बँगलोरच्या गोलंदाजीची पिसे काढण्यास सुरुवात केली. त्याने सॅम्युअल बद्री टाकत असलेल्या पहिल्या षटकात १८ धावा चोपताना कोलकाताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. परंतु, टायमल मिल्सने गंभीरला बाद करुन कोलकाताला पहिला धक्का दिला. तरीही नरेनमुळे कोलकाताची धावसंख्या वेगाने वाढत होती. स्टुअर्ट बिन्नीने नरेनला बाद करुन बँगलोरची धुलाई थांबवली. नरेनने १७ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ३४ धावा कुटल्या. यानंतर रॉबिन उथप्पा (११) व युसुफ पठाण (८) स्वस्तात परतल्याने कोलकाताच्या धावांचा वेग मंदावला. यजुवेंद्र चहलने ३ बळी घेतले. (वृत्तसंस्था)
आरसीबीने यावेळी आयपीएल इतिहासातील सर्वात नीचांकी ४९ धावसंख्येची नोंद केली. यापूर्वी २०१४ मध्ये अबूधाबी येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबीच्या ७० धावा झाल्या होत्या.
आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये एकाच सामन्यात २० फलंदाज बाद होण्याची ही दुसरी वेळी आहे.
एकूण १० आयपीएलमध्ये विराट कोहली शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे आणि दोन्ही सामने आरसीबीने गमावले होते.
बंगळुरू येथे १८ एप्रिल २००८ रोजी केकेआरने आरसीबी संघाचा ८२ धावांत खुर्दा केला होता.
सुनील नरेनने ३४ धावांची केलेली महत्त्वपूर्ण खेळी निर्णायक ठरली.आरसीबीचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.यापूर्वीची नीचांकी धावसंख्या राजस्थान रॉयल्सची आरसीबीविरुद्ध ५८ धावांची होती.
योगायोग
आरसीबीने आयपीएलच्या इतिहासात २३ एप्रिल २०१३ रोजी ५ बाद २६३ अशी सर्वाेच्च धावसंख्या केली होती. 23 एप्रिल २०१७ ला आरसीबीची ४९ नीचांकी धावसंख्या नोंदवली गेली.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : १९.३ षटकात सर्वबाद १३१ धावा (सुनील नरेन ३४, ख्रिस वोक्स १८; यजुवेंद्र चहल ३/१६) वि.वि. रॉयल चँलेंजर्स बँगलोर : ९.४ षटकात सर्वबाद ४९ धावा (केदार जाधव ९; कॉलिन डी ग्रँडहोम ३/४, ख्रिस वोक्स ३/६, नॅथन कुल्टर-नाइल ३/२१)